संक्रमण शिबिराच्या गाळ्यांवरून मुंबई मंडळ आणि दुरूस्ती मंडळ आमने-सामने

 CST
संक्रमण शिबिराच्या गाळ्यांवरून मुंबई मंडळ आणि दुरूस्ती मंडळ आमने-सामने
CST, Mumbai  -  

पावसाळ्यात धोकायदाक वा अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारत कोसळली, तर त्यातील रहिवाशांना कुठे स्थलांतरीत करायचे, असा प्रश्न म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाला पडला आहे. कारण सध्या शहरात एकही संक्रमण शिबीर वा संक्रमण शिबिरातील गाळे दुरूस्ती मंडळाकडे शिल्लक नाहीत. असे असताना लवकरच दुरूस्ती मंडळाकडे हस्तांतरीत होणाऱ्या गिरणी कामगारांच्या प्रकल्पातील गाळे मुंबई मंडळाने बीडीडीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुरूस्ती मंडळाने यावर आक्षेप घेत दुरूस्ती मंडळासाठी किमान हजार गाळे तरी राखीव ठेवावेत, असे पत्रच मुंबई मंडळाला पाठवले आहे. यावरून या दोन्ही मंडळामध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.

मोकळी संक्रमण शिबिरेच उपलब्ध नाहीत -
शहरात जितकी संक्रमण शिबिरे होती ती सर्व शिबिरे पात्र रहिवाशी आणि घुसखोरांनी भरली आहेत. आता शहरात मोकळे संक्रमण शिबीरच शिल्लक नाही. उपनगरामध्ये मोठ्या संख्येने संक्रमण शिबिराचे गाळे दुरूस्ती मंडळाकडे उपलब्ध आहेत, पण शहरातील रहिवासी उपनगरात जाण्यास तयार नसल्याने शहरातच गाळे उपलब्ध करून देण्याचे आव्हान दुरूस्ती मंडळासमोर उभे ठाकले आहे.

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना कुठे स्थलांतरीत करायचे?
त्यातच पावसाळा जवळ येत असून यंदा अंदाजे 9 उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे या अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना कुठे स्थलांतरीत करायचे? असा प्रश्न आहे. पावसाळ्यात इमारत कोसळण्याची भिती अधिक असल्याने काही गाळे तयार ठेवणे अत्यंत गरजेचे असते. असे असताना शहरात संक्रमण शिबीर वा गाळेच शिल्लक नसल्याची माहिती दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

बीडीडीवासीयांना गाळे देऊ नये असे म्हणणे नाही -
मुंबई मंडळाकडून गिरणी कामगारांच्या प्रकल्पातून मिळणारे संक्रमण शिबिरातील गाळे हाच आता दुरूस्ती मंडळासाठी आधार आहे. मात्र हेच गाळे बीडीडीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. बीडीडीत 16 हजार रहिवासी असून पहिल्या टप्प्यात जरी त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार असले तरी त्यासाठी हजारो गाळे मुंबई मंडळाला लागणार आहेत. त्यामुळे दुरूस्ती मंडळाच्या हक्काचे गाळे त्यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाला पत्र लिहिल्याच्या वृत्ताला भांगे यांन दुजोरा दिला आहे. मात्र बीडीडीवासीयांना गाळे देऊ नये, असे आमचे म्हणणे नाही. तर गिरणी कामगारांच्या प्रकल्पातील किमान 1000 गाळे तरी आमच्यासाठी राखीव ठेवावीत ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र मुंबई मंडळाला बीडीडीसाठी मोठ्या प्रमाणावर गाळ्यांची गरज लागणार असल्याने आता दुरूस्ती मंडळासाठी कसे गाळे ठेवायचे ? असा प्रश्न मुंबई मंडळासमोर उभा ठाकला आहे. दुरूस्ती मंडळाने हे गाळे देण्यास आक्षेप घेतला, तर बीडीडीच्या प्रकल्पावर त्याचा परिणाम होणार असल्याने मुंबई मंडळासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मात्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने मुंबई मंडळाला गाळे मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता यावर म्हाडा प्राधिकरण कसा तोडगा काढते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला, पण ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Loading Comments