Advertisement

तयार व्हा, गोराई ते बोरीवली, मालाड ते मार्वे दरम्यान रोप वे प्रवासाला!

न्यूयॉर्क, कोलंबिया, तुर्की इ. देशांमध्ये रोप वे योजना यशस्वी झाली आहे. मुंबईसारख्या शहरात जिथं रहिवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो, अशा शहरांत रोप वे योजना फायद्याची ठरू शकते.

तयार व्हा, गोराई ते बोरीवली, मालाड ते मार्वे दरम्यान रोप वे प्रवासाला!
SHARES

गोराई ते बोरीवली आणि मालाड ते मार्वे मार्गावर रोप वे सेवा सुरू करणं तसंच मुंबईच्या मेट्रो परियाेजनेअंतर्गत सर्व मेट्रो स्थानकांवर मल्टी माॅडल इंटीग्रेशन प्रकल्प सुरू करण्याला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा (MMRDA)चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   

प्राधिकरणाची १४८ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रमुख सचिव डाॅ. नितीन करीर इ. उपस्थित होते.  

प्रकल्प अहवाल

मालाड ते मार्वे आणि गोराई ते बोरिवली या दोन्ही ४.५ कि.मी. लांबीच्या अंतरासाठी रोपवे प्रकल्प शक्य आहे की नाही हे पाहण्यासाठी मे. इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लि. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. या प्रकल्पांमुळे पूर्व आणि पश्चिम भाग जोडता येणार आहे. तसंच मालाड मेट्रो स्टेशन, मार्वे, बोरिवली रेल्वे स्थानक, मेट्रो-२ अ आणि गोराई जेटीपर्यंत पोहोचता येणार आहे. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मेट्रो प्रणाली ही केवळ एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी पोहचविणारी व्यवस्था नाही. तर प्रवाशांसाठी ही प्रणाली पूर्णपणे समाधान देणारी असायला हवी. थोडक्यात, फक्त प्रवास करण्यासाठी नव्हे तर समाधानकारक प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उद्युक्त करणारी प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रोमधून उतरल्यानंतर गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्यास प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यादृष्टिने नियोजन करावे. 

बहुवाहतूक प्रकल्प

बैठकीत मुंबईतील विविध मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० हजार कोटी मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे मेट्रो स्थानकाच्या परिसरात पादचारी मार्गांचं रूंदीकरण, सायकल मार्ग, वाहनतळ परिसर, रहदारी सिग्नल सुधारणा, रस्त्यावरील दिवे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, स्थळदर्शक नकाशे, मेट्रो स्थानकापासून ये-जा करणाऱ्या बस सेवा, इतर पायाभूत सुविधांचं अद्ययावतीकरण इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानकापर्यंत सुविधा मिळणार आहे. याबरोबरच सर्व मेट्रो मार्गांखालील रस्त्यांचा विकासही या प्रकल्पांर्गत करण्यात येणार आहे. 

यासंदर्भात आर. ए. राजीव म्हणाले की, न्यूयॉर्क, कोलंबिया, तुर्की इ. देशांमध्ये रोप वे योजना यशस्वी झाली आहे. मुंबईसारख्या शहरात जिथं रहिवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो, अशा शहरांत रोप वे योजना फायद्याची ठरू शकते. प्रायोगिक तत्वावर ही योजना सफल झाल्यास आम्ही दुसरी योजना राबवण्याचा प्रयत्न करू.हेही वाचा-

बेस्टचा प्रवास झाला स्वस्त, नवे तिकीट दर लागू

हुश्श! रिक्षाचालकांचा राज्यव्यापी संप अखेर मागेRead this story in हिंदी
संबंधित विषय