कोस्टल रोडचा विस्तार थेट घोडबंदरपर्यंत

 Pali Hill
कोस्टल रोडचा विस्तार थेट घोडबंदरपर्यंत
कोस्टल रोडचा विस्तार थेट घोडबंदरपर्यंत
See all

मुंबई - राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या मरीन ड्राईव्ह ते कांदिवली या कोस्टल रोडचा विस्तार होणार आहे. या कोस्टल रोडचा विस्तार मार्वे ते घोडबंदर असा होणार असून विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मार्वे ते घोडबंदर रोड कोस्टलरोडच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत, अशी माहिती एमएमआरडीएचे उपमहानगर आयुक्त दिलीप कवठकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली. त्यामुळे आता मरिन ड्राईव्ह ते थेट घोडबंदर असा कोस्टल रोड जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होऊन मरीन ड्राईव्हवरून पश्चिम उपनगरात आणि ठाण्यात पोहचणे सोपे होणार आहे.

मरिन ड्राईव्ह ते कार्टर रोड, वांद्रे आणि वांद्रे ते कांदिवली अशा दोन टप्प्यात कोस्टल रोडचे काम होणार आहे. दरम्यान राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी कोस्टलरोडच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेत त्यासंबंधी एमएमआरडीएकडे विचारणा केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने मार्वे ते घोडबंदर कोस्टलरोडच्या व्यहार्यता अभ्यासासाठी निविदा मागवल्या आहेत.

दरम्यान आठ मार्गिकेचा हा कोस्टल रोड असणार असून त्यातील दोन मार्गिका बीआरटीएससाठी राखीव असणार आहे. तर या प्रकल्पासाठी अंदाजे 186 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. यातील 91 हेक्टर जागेचा विकास ग्रीन झोन म्हणून केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च किती असेल? मार्ग कसा जाईल? यासंबंधीची उत्तरे व्यवहार्यता अभ्यासानंतरच मिळतील.

Loading Comments