Advertisement

कोस्टल रोड लगत सागरी संरक्षक भिंतीची उभारणी

ही भिंत बांधताना पुराची सर्वोच्च पातळीही लक्षात घेण्यात आली आहे.

कोस्टल रोड लगत सागरी संरक्षक भिंतीची उभारणी
SHARES

कोस्टल रोडच्या  कामाने वेग धरला आहे. साडेदहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर साडेआठ किलोमीटर लांबीच्या सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे.

आतापर्यंत सात किलोमीटर लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईत पुराचा धोका टळेल, असा दावा महापालिकेने केला आहे.

येत्या २३ ते २५ मे या कालावधीत मुंबईत होणाऱ्या जी २०च्या दुसऱ्या आपत्ती जोखीम निवारण बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेकडून या प्रकल्पांतर्गत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन उपायायोजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

सागरी किनारा मार्ग हा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंक असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी सुमारे १३.६० टक्के क्षेत्रफळ म्हणजे १५ लाख ६० हजार ७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) सागरी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

वांद्रे -वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्गाची जोड देताना या मार्गावर प्रियदर्शनी पार्कपासून ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीच अभेद्य अशी सागरी संरक्षक भिंतीची उभारणी केली जात आहे.

सध्या सात ते सव्वा सात किलोमीटरपर्यंत या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. ही भिंत साधारण सहा ते नऊ मीटर उंच आहे. भिंत बांधण्यासाठी 'आर्मर रॉक' म्हणजेच बसाल्ट प्रकारचे दगडांचा वापर करण्यात आला आहे.

असे एक ते चार टनांचे असलेल्या दगडांचे दोन थर रचण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांपासून सागरी किनाराचे बचाव होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पुराचे पाणीही आत येऊ शकणार नाही.

ही भिंत बांधताना पुराची सर्वोच्च पातळीही लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील काही भाग पाणी तुंबण्यापासून वाचू शकतील.

गंज, मातीची धूप आणि भरती-ओहोटीच्या परिणामांची काळजी पण घेतली जाईल, असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा