Advertisement

टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेतून विकास

या कामांसाठी एकूण 33 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेतून विकास
SHARES

रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकांजवळील शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांचा विकास हाती घेतला आहे. रेल्वेच्या अमृत योजनेतून ही कामे केली जात आहेत. या कामांसाठी एकूण 33 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

अमृत योजनेंतर्गत टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला एस्केलेटर, लिफ्ट, सोयीच्या ठिकाणी तिकीट खिडक्या, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कामासाठी रेल्वेने 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद केल्यानंतर रेल्वेने या फाटकावर उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी 50 कोटी 53 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीत राज्य सरकार, रेल्वेचा अर्धा वाटा आहे. या पुलाच्या कामासाठी आतापर्यंत 14 कोटी 57 लाख रुपये खर्च झाले आहेत. 

आतापर्यंत या पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

शहाड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांसाठी अमृत योजनेतून आठ कोटी ३९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण, डोंबिवलीनंतर टिटवाळा परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. या भागात नागरीकरण वाढत आहे. 

मुंबईतील बहुतांश कर्मचारी, व्यावसायिक टिटवाळा परिसरात राहायला आले आहेत. टिटवाळा हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. टिटवाळ्यात दररोज शेकडो भाविक येतात. टिटवाळा रेल्वे स्थानकात होणारी गर्दी लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकात अधिकाधिक प्रवाशांच्या सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

मुरबाड शहरातून येणारे बहुतांश वाहनधारक टिटवाळा शहराला मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण मानतात. ही वाहने भिवंडी वळण रस्ता किंवा पडघा येथून मधल्या मार्गाने जातात. ही वाहने टिटवाळा शहरात आल्यावर टिटवाळ्यात कोंडी होते. त्यामुळे रेल्वे फाटकाच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर बाहेरून येणारी वाहने टिटवाळा शहरात न येता इच्छित स्थळी जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

शहाड ते टिटवाळा स्थानकांमधील २० टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

BMC च्या वांद्रे स्कायवॉक प्रकल्पाच्या किंमतीत वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा