मेट्रो-3 मुळे गिरगावकर आक्रमक


मेट्रो-3 मुळे गिरगावकर आक्रमक
SHARES

मुंबई – मेट्रो-3 च्या प्रकल्पामुळे गिरगावकर आक्रमक झालेत. मेट्रो रेल काँर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) ने भू-तांत्रिक चाचणीच्या नावाखाली प्रत्यक्ष मेट्रो-3 च्या बांधकामाला सुरूवात केल्याचं गिरगावकरांनी म्हटलंय. गिरगाव-काळबादेवी परिसरातील विस्थापितांना वाऱ्यावर ठेवत, त्यांचा विश्वासघात करत काम सुरू केल्याचा आरोप करत गिरगावकरांनी गुरूवारी बॅरिगेटसला काळं फासत काम बंद केले होतं. आता हे काम पूर्णत बंद पाडण्याचा आक्रमक पवित्रा गिरगावकरांनी घेतला आहे. जोपर्यंत 500 मीटरच्या आत पूर्नवसन करण्याचा अध्यादेश जारी होत नाही तोपर्यंत भू-तांत्रिक चाचणी असो वा प्रत्यक्ष काम आम्ही मेट्रो-3 ची एक वीटही एमएमआरसीला रचू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी दिलाय. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी मात्र गिरगावकरांचे पुनर्वसन योग्य प्रकारे आणि त्यांच्या मागणीनुसारच होणार असा पुनरूच्चार ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केलाय. पुनर्वसनाचा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचं त्या म्हणाल्यात. हा प्रस्ताव मंजूर झाला की गिरगावकरांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान गिरगावकरांचा मात्र याच्यावर विश्वास नाही. एका रात्रीत बँरीगेटस लावत रस्त्यांवर मोठाले खड्डेच्या खड्डे पाडले जात आहेत. तेव्हा ही कसली भू-तांत्रिक चाचणी, एमएमआरसीने मेट्रो स्थानकाच्या कामाला सुरूवात केली आहे, असे म्हणत आम्ही गिरगावकरचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी एमएमआरसीवर टीका केली आहे. दरम्यान 21 मागण्यांचे निवेदन एमएमआरसीला पाठवण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्यावर लेखी उत्तर एमएमआरसीकडून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत काम बंदच राहणार असून, त्यानंतर पुनर्वसनाचा तिढा सुटला नाही तर मेट्रो-3 चे काम रखडण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय