गुढीपाडवा... बिल्डरांकडून सलवतींचा पाऊस

  Mumbai
  गुढीपाडवा... बिल्डरांकडून सलवतींचा पाऊस
  मुंबई  -  

  मुंबई - एक बंगला बने न्यारा असे म्हणत प्रत्येकजण आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहतो आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाची अशी गृहखरेदी करण्यासाठी अनेकजण एक शुभ मुहुर्त शोधतात. अशा वेळी गुढीपाडव्याचा मुहुर्त अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गृहखरेदी, गृहनोंदणी, गृहताबा, गृहप्रवेश अशा व्यवहारांना चालना मिळते आणि मालमत्ता बाजारपेठेत तेजीची गुढी उभारली जाते.

  भारतीय मानसिकतेनुसार सोने, गाडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि गृहखरेदीसाठी दसरा, पाडवा, अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा असे साडे तीन मुहुर्त शुभ मानले जातात. गुढी पाडवा म्हणजे हिंदु नववर्षाची सुरूवात. त्यामुळे गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर गृहखरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या संधीचा फायदा घेत बिल्डरही सवलतींचा पाऊस पाडतात. यंदाही बिल्डरांनी गृहप्रकल्पावर अनेक सवलती देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार काही बिल्डरांनी सेवा शुल्क आणि इतर शुल्कावर सुट वा शुल्क माफ केले आहे. तर काही बिल्डरांनी घरांच्या किंमतींवर सवलती जाहिर केल्या आहेत. तर काहींनी भेटवस्तुंचा पाऊस पाडला आहे. चांदी-सोन्यांच्या नाण्यांपासून एसी, एलईडी, मॉड्युलर किचन भेटवस्तु म्हणून जाहीर केल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोफत कारही ऑफर केली आहे.

  गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. असे असले तरी दसरा, पाडावा, अक्षय तृतीया आणि गुढी पाडवा अशा साडे तीन मुहुर्तावर मात्र मंदीत चाललेल्या मालमत्ता बाजारपेठेला थोडी का होईना पण उभारी येते अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी दिली आहे. तसंच शुभ मुहुर्तावर नव्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्याकडे आमचा कल असल्याने या दिवशी नव्या प्रकल्पांचा शुभारंभही मोठ्या संख्येने होतो, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

  तेव्हा, गृहखरेदीदारांनो हक्काच्या घराचे स्वप्न सवलतीच्या दरात पूर्ण करायचे असेल तर गुढी पाडव्याचा शुभ मुहुर्त गाठाच. दरम्यान गुढी पाडव्याच्या निमित्ताने मंदीत असलेल्या मालमत्ता बाजारपेठेत तेजीची गुढी उभी राहिल अशी आशा बिल्डरांकडून केली जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.