Advertisement

मुंबईत नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी

स्टॅम्प ड्युटी कपात आणि दिवाळीतील सवलतींमुळे मालमत्तांच्या खरेदीत गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत तब्बल ६७% वाढ झाली आहे.

मुंबईत नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी
SHARES

नाईट फ्रँक इंडिया, या आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनीच्या आकडेवारीनुसार मुंबईत नोव्हेंबर २०२० मध्ये ९,३०१ इतक्या नवीन मालमत्तांची नोंद झाली असून स्टॅम्प ड्युटी कपात आणि दिवाळीतील सवलतींमुळे मालमत्तांच्या खरेदीत गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत तब्बल ६७% वाढ झाली आहे. 

नोव्हेंबर २०२० मध्ये १७%, ऑक्टोबर २०२० दरम्यान ४२% , सप्टेंबर २०२० दरम्यान ११२% अशी ही वाढ झाली आहे. कोविड आणि लाॅकडाऊनमुळे मालमत्तांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली होती. मात्र अनलाॅकची प्रक्रिया सुरू होताच मालत्तांच्या व्यवहारांनी देखील वेग पकडला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये मालमत्तांची झालेली नोंद ही मागील ९ वर्षांतील नोव्हेंबर महिन्यांतील सर्वाधिक नोंद आहे. 

स्टॅम्प ड्युटीमध्ये राज्य सरकारने केलेली ३ टक्क्यांची कपात आणि गृहकर्जांच्या व्याजदरात झालेली घसरण नवीन घर घेण्यास इच्छुक ग्राहकांना आकर्षित करू लागली आहे. शिवाय कोरोना कालावधीत आर्थिक झळ बसल्यानंतर बऱ्याच विकासकांनी आपल्या मालमत्तांच्या किंमती कमी करून ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव देखील केला. त्यामुळे दसरा, दिवाळी अशा सणांच्या कालावधीत घर खरेदीला चालना मिळाली.

लॉकडाऊनमुळे बर्‍याच कुटुंबांना त्यांच्या घरात वेगवेगळ्या खोल्या असण्याची गरज भासू लागली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्राहक नवीन घरांचा शोध घेऊ लागले आहेत. सोबतच मागील काही वर्षांपासून घरांच्या शोधात असलेले ग्राहक देखील घर खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं मानत आहेत.

हेही वाचा- बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर आता एकसमान मुद्रांक शुल्क

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० दरम्यान स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर मुंबईत एकूण २२,८२७ नवीन घरांची विक्री झाली आहे. या कालावधीतील स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर २०१९ मधील मासिक सरासरीच्या अंदाजे १३५% किंवा १.३५ पट आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात होऊनही राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटीमधून ऑगस्ट २०२० मध्ये १,७६४ कोटी रुपये, ऑक्टोबर २०२० मध्ये २,३२८ कोटी आणि नोव्हेंबर २०२० मध्ये २,८७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

यासंदर्भात नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “मुंबईत निवासी विक्रीसाठी मर्यादित कालावधीची स्टॅम्प ड्युटी कपातीची सवलत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सणासुदीचा कालावधी, गृहकर्जाचा कमी व्याजदर आणि विकासकांकडून देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे देखील विक्रीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने गृहनिर्माण क्षेत्रात आत्मविश्वास परतला आहे.”

शिशिर पुढं म्हणाले, “या बाजारातील मागणीचा वेग वर्षाखेरीसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आणखी खरेदीदार त्यांच्या स्वप्नातील घरे खरेदी करण्याकरीता या अनुकूल वेळेचा लाभ घेण्यासाठी बाजारात येतील, असं आम्हाला वाटत आहे.”

(highest property registration in mumbai during november as per knight frank report)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा