Advertisement

मुंबईतील घरे महागणार


मुंबईतील घरे महागणार
SHARES

मुंबई - नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून शनिवारी 2017-18 साठीचे रेडी रेकनरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार मुंबईतील रेडी रेकनच्या दरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर राज्यातील रेडी रेकनरचे दर 6 टक्क्यांनी वाढल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकारी सुधाकर नांगनुरे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. शनिवार 1 एप्रिल 2017 पासून हे दर लागू झाले आहेत. रेडी रेकनर 4 टक्क्यांनी वाढल्याने मुद्रांक शुल्काच्या रकमेत टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर दुसरीकडे जीएसटीमुळे होणारी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार प्रस्तावित केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास रेडी रेकनरमधील वाढ आणि एक टक्का अधिभार यामुळे सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न महागणार आहे.

मुंबईतील एकूण रेडी रेकनरच्या दरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 50 लाखांच्या घरांसाठी आतापर्यंत जिथे ग्राहकाला अडीच लाख रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते तिथे आता अंदाजे पावणे तीन लाख रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. गेल्या वर्षभरात मालमत्ता बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून मालमत्तेचे दर स्थिर आहेत किंबहुना अनेक ठिकाणी दर कमी झाले आहेत. असे असताना सरकारच्या रेडी रेकनरच्या दरात 4 टक्क्यांची वाढ कशी झाली हा प्रश्नच असल्याचे म्हणत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. महसूल वाढावा यासाठी सरकार कृत्रिम दरवाढ करत ग्राहकांचे घराचे स्वप्न महाग करत असल्याचे म्हणत असोसिएशनचे सदस्य आनंद गुप्ता यांनी ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. यासंबंधी लवकरच सरकारला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा रेडी रेकनरचे दर किमान 10 टक्क्यांनी कम व्हायला हवे होते तिथे 4 टक्क्यांनी दर वाढवले आहेत. हे अत्यंत अव्यवहार्य असून 4 टक्के दरवाढही खूप मोठी असल्याची प्रतिक्रिया मालमत्ता बाजारपेठेतील तज्ज्ञ अॅड. विनोद संपत यांनी दिली आहे. त्यातच पालिकेनेही मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक भार सोसावा लागणार असल्याचेही संपत यांनी सांगितले आहे.

रेडी रेकनर म्हणजे काय?

मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर 5 टक्के मुद्रांक शुल्क सरकारकडून आकारले जाते. हे मुद्रांक शुल्क ठरवण्यासाठी मालमत्ता बाजारपेठेचा अभ्यास करत मालमत्तेचे बाजारमूल्य ठरवले जाते आणि हे बाजारमूल्य म्हणजेच रेडी रेनकर दर. या दरानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा