मुंबई - स्कॉर्पिन श्रेणीतील दुसरी पाणबुडी ‘आयएनएस खांदेरी’ लवकरच भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडतर्फे (एमडीएल) १२ जानेवारीला याचे जलावतरण करण्यात येणार आहे. या पाणबुडीच्या सर्व उपकरणांची जोडणी करण्यात आली असून ९५ टक्के केबलिंग आणि पाईपिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ‘प्रोजेक्ट-७५’ अंतर्गत माझगाव डॉकमध्ये फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीच्या मदतीने सहा पाणबुडय़ांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामधलीच खांदेरी ही एक पाणबुडी आहे.
'खांदेरी'ची वैशिष्ट्ये
- आधुनिक आणि नव्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर
- युद्धनौका आणि पाणबुड्या यांचा खात्मा करण्यास सज्ज
- पाण्यात आणि भूपृष्ठावर मारा करणा-या क्षेपणास्त्रांनी सज्ज
- मार्गदर्शक शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूचे कंबरडे मोडण्याची क्षमता
- शत्रूच्या पाणबुडीच्या किंवा युद्धनौकेच्या कक्षेत न सापडणे
खांदेरी नावामागील इतिहास
- 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या ‘खांदेरी’ या किल्ल्याच्या नावावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे.
- यापूर्वीही डिसेंबर १९६८ साली कलवरी श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी ‘आयएनएस खांदेरी’ नौदलात सामील करण्यात आली होती.
- २१ वर्षाच्या देशसेवेनंतर १९८९ साली ही पाणबुडी नौदलातून निवृत्त झाली.
- सेवेतून निवृत्त झालेल्या युद्धनौका आणि पाणबुडय़ांची नव्याने उभारणी करून पुन्हा नौदलात रूजू करण्याची भारतीय नौदलाची परंपरा आहे.