Advertisement

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?

कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोअर परळ-एल्फिन्स्टन परिसरातील कार्यालयं येत्या काळात अंधेरी, गोरेगाव, बोरिवली तसंच पवई इथं स्थलांतरीत होण्याची शक्यता लायसेस फोरास रिअल इस्टेट रेटिंग अॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक पंकज कपूर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली.

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?
SHARES

काॅर्पोरेट हब अशी मागील १५ वर्षांपासून ओळख जपलेल्या लोअर परळ आणि एल्फिन्स्टन परिसरातील मालमत्तांचे 'भाव' पडण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेली एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ठरणारा लोअर परळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने लोअर परळ-एल्फिन्स्टन परिसरात कामासाठी येणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी या परिसरातील मल्टिनॅशनल कंपन्या आणि इतर खासगी कंपन्यांची कार्यालयं इथून पळ काढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


गिरणगावाचा कायापालट

गिरणगाव अशी ओळख असलेल्या या परिसरात गेल्या १५ वर्षांत पुनर्विकासाच्या माध्यमातून टोलेजंग व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या आहेत. या टोलेजंग व्यावसायिक इमारतींमध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांसह खासगी कंपन्यांनी कार्यालय भाड्यानं वा विकत घेतली आहेत. पेनिन्सुला काॅर्पोरेट पार्क-बिझनेस पार्क, उर्मी इस्टेट, इंडिया बुल्स, मॅरेथाॅन, कमला मिल कपाऊंड, फिनिक्स माॅल, पॅलिडीयन माॅल, शाह अॅण्ड नाहर, अध्यारू इंडस्ट्रियल इस्टेट, सनमिल कपाऊंड इथं असंख्य कंपन्यांनी आपापली एक ना अनेक काॅर्पोरेट कार्यालयं इथं थाटली गेली आहेत. कार्यालयांची ही वाढती मागणी लक्षात घेता इथल्या भाड्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत.




पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष

एकीकडे पुनर्विकासाच्या माध्यमातून या परिसरात इतक्या मोठ्या संख्येनं व्यावसायिक-निवासी बांधकाम उभी राहिली खरी. पण परिसरात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचं मोठं दुर्लक्ष झालं आहे. इथं येणाऱ्या वाहनांसाठी रस्ते अपुरे पडत असून इतर सुविधांचा अभाव आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी हे त्याचं ज्वलंत उदाहरण. अपुरे रस्ते आणि वाहतूककोंडीमुळं कामावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर चेंगराचेंगरी प्रकरणानंतर नोकरदारांच्या मनातही भीतीने घर केलं आहे.


पूल बंद केल्याने अडचण

अशातच १० दिवसांपूर्वी लोअर परळमधील सर्वात महत्वाचा लोअर परळ पूल धोकादायक ठरल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळं लोअर परळ रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर येथील कार्यालयात येणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालावा लागत आहे. हा पूल तब्बल २ ते ३ वर्षानंतर खुला होण्याची शक्यता असल्याने काॅर्पोरेट कंपन्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.




स्थलांतराची शक्यता

ही परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोअर परळ-एल्फिन्स्टन परिसरातील कार्यालयं येत्या काळात अंधेरी, गोरेगाव, बोरिवली तसंच पवई इथं स्थलांतरीत होण्याची शक्यता लायसेस फोरास रिअल इस्टेट रेटिंग अॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक पंकज कपूर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली.


प्राॅपर्टीवर परिणाम

लोअर परळ-एल्फिन्स्टनमध्ये पायाभूत सुविधाच नसून त्यात चेंगराचेंगरी नि पूल बंद पडण्यासारख्या घटना घडत असल्यानं त्याचा निश्चितच परिणाम इथल्या मालमत्ता बाजारपेठेवर होणार आहे. कार्यालयांसाठीच्या भाड्याच्या दरामध्ये घट होण्याची तसंच मालमत्ता विकत घेण्याच्या व्यवहारांमध्ये घट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. हा बदल आता लगेच नाही पण पुढच्या वर्षभरात दिसू लागेल, असंही कपूर यांनी स्पष्ट केलं.


कुठं जाणार?

बीकेसी हे आर्थिक केंद्र म्हणून विकसित झालं असलं, तरी नव्या बांधकामासाठी तिथं जागा उरलेली नाही. त्यामुळं लोअर परळ-एल्फिन्स्टनमधील मल्टिनॅशनल कंपन्यांसह खासगी कंपन्यांची कार्यालये पश्चिम-मध्य उपनगरात स्थलांतरीत होण्याची शक्यताही कपूर यांनी व्यक्त केली. ही शक्यता किती खरी ठरते हे आता येणारा काळच सांगेल.



हेही वाचा-

४ प्राॅपर्टी वेबसाइट्सला 'महारेरा'ची नोटीस

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा