Advertisement

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्रथम पसंतीचे राज्य!


गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्रथम पसंतीचे राज्य!
SHARES

'महाराष्ट्राने मागील ४ वर्षांमध्ये ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला आहे. राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून, महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषिक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे,' असे सांगत राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शासनाची पाठ थोपटली आहे.


राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ६९ व्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जनतेला शुभेच्छा देतानाच राज्याच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, समाजातल्या दुर्बल घटकांबाबतही शासनाने चांगल्या योजना राबवून नवा पायंडा घातल्याचं ते म्हणाले.


वर्षभरात सुमारे सव्वा लाख कोटींची गुंतवणूक

राज्यपालांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या योजनेवरही समाधान व्यक्त केले. देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अधिक पसंतीचे राज्य राहिले आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये राज्याला १.३ लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.


रस्त्यांच्या कामांवर समाधानी

पायाभूत सुविधांबाबत बोलताना राज्यपालांनी शासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत सांगितले की, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील २२६ रेल्वे पुलांसह, ७४२ उड्डाणपुलांची बांधकामे आणि २७,३७१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्राम-सडक योजनेअंतर्गत, जवळपास १,५०० कि.मी.चे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत.


रोज सव्वा कोटी प्रवाशांना मेट्रोची सेवा

महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरांत १,४२,३०६ कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीद्वारे सुमारे ३५० कि.मी. महामार्गाचे जाळे उभारण्याचे नियोजित केले आहे. या मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून दररोज ११.१ दशलक्ष इतक्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळणार आहे. त्यामुळे राज्यात नागरी सुविधा वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा