Advertisement

धारावी पुनर्विकासातून ७ हेक्टर जागा वगळा, म्हाडाची मागणी

या पुनर्विकासात सेक्टर-५ मधील म्हाडाच्या मालकीच्या ७ हेक्टर जागेचा समावेश आहे. ही जागा हातातून जाऊ नये म्हणून म्हाडाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार गृहनिर्माण विभागाला पत्र लिहित धारावी पुनर्विकासातून म्हाडाच्या मालकीची ७ हेक्टर जागा वगळण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.

धारावी पुनर्विकासातून ७ हेक्टर जागा वगळा, म्हाडाची मागणी
SHARES

धारावीतील पाचही सेक्टरचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत असून त्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी)कडून निविदाही मागवण्यात आल्या आहेत. या पुनर्विकासात सेक्टर-५ मधील म्हाडाच्या मालकीच्या ७ हेक्टर जागेचा समावेश आहे. ही जागा हातातून जाऊ नये म्हणून म्हाडाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार गृहनिर्माण विभागाला पत्र लिहित धारावी पुनर्विकासातून म्हाडाच्या मालकीची ७ हेक्टर जागा वगळण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.


सेक्टर निहाय पुनर्विकास

धारावीतील ६२ हेक्टर जागेचा पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार आहे. याआधी या जागेचे ५ सेक्टर करत सेक्टर निहाय पुनर्विकास केला जाणार होता आणि त्यातील सेक्टर-५ ची जबाबदारी म्हाडाकडे होती. सेक्टर-५ मध्ये म्हाडाची ७ हेक्टर जागा आहे. या जागेवरील जुनी संक्रमण शिबिर पाडत काही वर्षांपूर्वीच म्हाडानं १५० कोटी खर्च करत नवी संक्रमण शिबिर उभारली आहेत. यात ३००० संक्रमण शिबिराचे गाळे आहेत.


टाॅवर उभारला

त्यातच या ७ हेक्टर जागेमधील मोकळ्या जागेवर सेक्टर-५ च्या पुनर्विकासांतर्गत म्हाडाने ३५० हून अधिक घरांचा एक टाॅवर उभारला आहे. तर अंदाजे १३०० घरांच्या २ टाॅवरचं काम सुरू होतं. पण आता हा संपूर्ण प्रकल्प विशेष प्रकल्पांतर्गत डीआरपीनं ताब्यात घेत त्याचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.


जागा जाण्याची शक्यता

त्यानुसार या ७ हेक्टर जागेचा आणि त्यावरील संक्रमण शिबिराचाही पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गतच केला जाणार आहे. मुळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे घरांसाठी मोकळी जागा नसताना हातात असलेली जागा म्हाडाच्या हातातून निघून जाणार आहे. तर संक्रमण शिबिरासह धारावीकरांसाठी उभारलेल्या पुनर्वसित इमारतीच्या बांधणीचा खर्चही वाया जाणार असून म्हाडाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पातून ७ हेक्टर जागा वगळावी, अशी मागणी म्हैसकर यांनी गृहनिर्माण विभागाकडे एका पत्राद्वारे केल्याची म्हैसकर यांनी सांगितलं आहे. तर म्हाडाला गृहनिर्माण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


पुनर्वसीत इमारतीचं बांधकामही ठप्प

म्हाडाच्या मालकीच्या या ७ हेक्टर जागेवरच धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्वसीत इमारती बांधण्यात येत आहेत. त्यातील एका इमारतीचं बांधकाम याआधीच पूर्ण झालं आहे. तर इमारत क्रमांक २ आणि ३ चं काम सुरू होतं ते आता डीआरपीच्या ताब्यात गेला आहे. इमारत क्रमांक २ मध्ये ६६० निवासी तर १२ अनिवासी गाळे असून इमारत क्रमांक ३ मध्ये ६७२ निवासी गाळे आहेत.


काम अर्धवट थांबलं 

त्याचवेळी इमारत क्रमांक ४ आणि ५ च्या आराखड्याला डीआरपीची मंजुरी मिळाली असून सीसीसाठी प्रस्तावही डीआरपीकडे गेला आहे. पण आता हा प्रकल्प डीआरपीनं ताब्यात गेल्यानं काम अर्धवट थांबलं आहे. हे काम कधी आणि कसं सुरू होणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करू देण्याची मागणीही पत्राद्वारे करण्यात आल्याचंही म्हैसकर यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं आहे.



हेही वाचा-

गिरणी कामगारांच्या घरांची लाॅटरी लटकली? कारण काय?

धारावी पुनर्विकासासाठी एकच निविदा; मुदतवाढीची पुन्हा नामुष्की



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा