Advertisement

Mumbai Live Impact! म्हाडाचा महाघोटाळा, खोट्या कागदपत्राद्वारेच शिवाजी पार्कमधील 'त्या' घराचं वितरण!!

नुकत्याच झालेल्या चौकशीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जाहिरात न काढताच शिवाजी पार्क येथील घराचं वितरण केल्याचं तसंच बनावट कागदपत्र तयार करत बोगस भाडेकरूंनी हे घर लाटल्याचं पुढे आलं आहे. इतकंच काय तर उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप पेठे यांनी केला आहे.

Mumbai Live Impact! म्हाडाचा महाघोटाळा, खोट्या कागदपत्राद्वारेच शिवाजी पार्कमधील 'त्या' घराचं वितरण!!
SHARES

म्हाडाला भ्रष्टाचारानं कसं पोखरून काढलं आहे आणि सर्वसामान्यांच्या घरावर दलाल, बोगस भाडेकरू आणि म्हाडाचे अधिकारी मिळून कसा डल्ला मारत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गेल्या वर्षी 'मुंबई लाइव्ह'नं आणि ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी दादर, शिवाजी पार्क येथील मास्टरलिस्टमधील घराच्या वितरणातील घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या वृत्ताने म्हाडात चांगलीच खळबळ उडून या घोटाळ्याची चौकशी लावण्यात आली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जाहिरात न काढताच या घराचं वितरण केल्याचं तसंच बनावट कागदपत्र तयार करत बोगस भाडेकरूंनी हे घर लाटल्याचं पुढे आलं आहे. इतकंच काय तर उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप पेठे यांनी केला आहे.


घराचं वितरण रद्द

या महाघोटाळ्याप्रकरणी अनेक बाबी समोर आल्यानं अखेर या घराचं वितरण रद्द करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळानं घेतला आहे. त्यानुसार ज्यांना या घराचं वितरण करण्यात आलं आहे, त्यांना दुरूस्ती मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली आहे. या नोटीशीनुसार पुढे सुनावणी करत घर वितरणासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल आणि दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


'असा' झाला महाघोटाळा

संक्रमण शिबिरातील मूळ भाडेकरूला मास्टरलिस्टमधील घरे देण्यासाठी त्या घराची जाहिरात काढत ज्येष्ठतेनुसार अर्थात संक्रमण शिबिरात सर्वात आधी स्थलांतरीत झालेल्या अर्जदार मूळ भाडेकरूला घराचं वितरण केलं जातं. असं असताना दुरूस्ती मंडळानं प्लाॅट क्रमांक १०३, गाळा क्रमांक १०२ शिवाजी पार्क रोड-३ दादर येथील प्राइम लोकेशन वरिल मास्टरलिस्टमधील ३०९ चौ. फुटाचं घर १ नोव्हेंबर २०१७ ला कोणतीही जाहिरात न काढताच वितरीत केलं. अनंत गडकर हे मूळ भाडेकरू दाखवत त्यांच्या बहिणी म्हणून सुलोचना राऊत आणि मिनाक्षी राऊत यांना या घराचं वितरण करण्यासाठी वितरण पत्र दुरूस्ती मंडळाकडून देण्यात आलं होतं.




खोटेपणाचा भांडाफोड

मात्र या घराचा ताबा देण्याआधीच दुरूस्ती मंडळ आणि राऊत भगिनींच्या खोटेपणाचा भांडाफोड झाला. एक तर १ कोटीपेक्षा अधिक किंमत असलेल्या घराची जाहिरात न काढता वितरण करण्यात आलं आणि तेही मूळ भाडेकरूसंबंधीची तसंच ज्यांना वितरण करण्यात येत आहे, त्यांची कोणतीही चौकशी न करता, असं म्हणत ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. हा मोठा घोटाळा असल्याचं म्हणत पेठे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. तर 'मुंबई लाइव्ह'ने यासंबंधीचं वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध करत पाठपुरावा सुरू केला.


'त्या' नावाचा भाडेकरूच नाही

'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर म्हाडात खळबळ उडाली नि म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी या घोटाळ्याची चौकशी लावली. त्यानुसार आता हे वितरण बेकायदेशीर असून अनंत गडकर नावाचा कुणी मूळ भाडेकरूच नसल्याचं समोर आलं आहे. असं असताना गडकर यांच नाव मास्टरलिस्टमध्ये दाखवत, गडकर यांच्या बहिणी म्हणून राऊत भगिणींना घराचं वितरण करण्यात आलं आहे. गडकर नावाची व्यक्ती तरी हयात आहे का? असा प्रश्न असतानाच या महाघोटाळ्यातील आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. ही बाब अशी की, हे घर लाटण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि या बोगस भाडेकरूंनी न्यायालयाचीही दिशाभूल न्यायालयाचा आधार घेत खोटी कागदपत्र तयार करत घर लाटल्याचंही समोर येत असल्याचं पेठे यांनी सांगितलं आहे.


म्हाडाच्या निर्णयाकडे लक्ष

या पार्श्वभूमीवर दुरूस्ती मंडळानं या घराचं वितरण करण्यासाठी 'कारणे दाखवा' नोटीस बाजवली असून आता घर रद्द होणार आहे. पण हा महाघोटाळा असून अशाप्रकारे अधिकारी, दलाल आणि बोगस भाडेकरू सर्वसामान्यांच्या घरावर डल्ला मारत असल्यानं अशा प्रकारांना कायमस्वरूपी चाप बसावी अशी मागणी करण्यासाठी सर्वच दोषींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान यासंबंधीचे सर्व आवश्यक ती कागदपत्रं 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली असून आता या महाघोटाळ्याप्रकरणी दुरूस्ती मंडळ आणि म्हाडा प्राधिकरण काय पाऊल उचलते? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा-

घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?

'मुंबई लाइव्ह' इम्पॅक्ट: हो, शिवाजी पार्कच्या 'त्या’घराचं वितरण जाहिरातीविनाच! म्हाडाची कबुली



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा