Advertisement

घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?

मुंबईतील घरांच्या लाॅटरीनंतर म्हाडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. म्हाडाच्या इमारत दुरूस्ती मंडळाने नियमाचा भंग करत मास्टरलिस्टमधील शिवाजी पार्क येथील एका घराचं बेकायदेशीररित्या वितरण केल्याचा धक्कादायक आरोप 'ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशन'चे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी केला आहे. शिवाजी पार्क येथील हे ३०९ चौ. फुटाचं हे घर अंदाजे १ कोटी रुपयांचं असून हे बेकायदा वितरण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे.

घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?
SHARES

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या मास्टरलिस्टमधील घरांचं वितरण जाहिरातीच्या माध्यमातूनच करणं नियमानं बंधनकारक आहे. असं असतानाही दुरूस्ती मंडळाने या नियमाचा भंग करत मास्टरलिस्टमधील शिवाजी पार्क येथील एका घराचं बेकायदेशीररित्या वितरण केल्याचा धक्कादायक आरोप 'ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशन'चे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी केला आहे. शिवाजी पार्क येथील हे ३०९ चौ. फुटाचं हे घर अंदाजे १ कोटी रुपयांचं असून हे बेकायदा वितरण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचं म्हणत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे केली आहे. यामुळे मुंबईतील घरांच्या लाॅटरीनंतर म्हाडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 


कुणाला मिळतं घर?

संक्रमण शिबिरातील ज्या पात्र रहिवाशांच्या इमारतीचा पुनर्विकास होणार नाही, अशा रहिवाशांना दुरूस्ती मंडळाकडून मास्टरलिस्टच्या माध्यमातून कायमस्वरूपी घरं वितरीत केली जातात. विकासकाकडून मिळालेल्या अतिरिक्त घरांचा समावेश या मास्टरलिस्टमध्ये असतो. 

२०१७ च्या लाॅटरीसाठी पुरेशी घरं मिळत नसल्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांची संख्या वाढवण्यासाठी मास्टरलिस्टमधील घरांचा समावेश लाॅटरीत करण्याचा प्रयत्न केला होता. पण संक्रमण शिबिरातील रहिवाशांनी जोरदार विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे म्हाडाची लाॅटरी २०१७ मध्ये मे महिन्यात न निघता आॅक्टोबरमध्ये निघाली.  काय आहे नियम?

या घराचं वितरण करण्यासाठी आधी जाहिरात काढावी लागते. या जाहिरातीनुसार पात्र रहिवाशांकडून अर्ज मागवले जातात. आलेल्या अर्जांची छाननी करत ज्येष्ठतेनुसार अर्थात जो अर्जदार सर्वात आधी संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झाला आहे, त्यानुसार संबंधित पात्र अर्जदाराला घराचं वितरण केलं जातं.


'असा' झाला घोटाळा

असं असतानाही प्लाॅट क्रमांक १०३, गाळा क्रमांक १०२, शिवाजी पार्क रोड-३, दादर येथील, प्राईम लोकेशवरील इमारतीतील मास्टरलिस्टमधील ३०९ चौ. फुटाचं घर १ नोव्हेंबर रोजी सुलोचना राऊत आणि मिनाक्षी राऊत यांना वितरीत करण्यात आलं. या घरासाठी दुरूस्ती मंडळानं जाहिरातच काढली नसल्याचा पेठे यांचा आरोप आहे.जाहिरातच काढली नाही

हे घर प्राईम लोकेशनवर असल्यानं या घरासाठी जाहिरात काढली असती, तर संक्रमण शिबिरार्थी (अर्जदार) त्यावर तुटून पडले असते आणि त्यातून पात्र अर्जदारालाच घराचं वितरण झालं असतं. पण दुरूस्ती मंडळानं असं न करता, या घराची जाहिरात न करताच गुपचुप या घराचं वितरण केल्याचं पेठे यांचं म्हणणं आहे.


भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

या घराची किंमत १ कोटींपेक्षा जास्त असल्यानं म्हाडा अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून या घराचं वितरण केल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. या दरम्यान पेठे यांनी म्हाडा उपाध्यक्षांकडं लेखी तक्रार करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.


म्हाडाच्या भूमिकेकडे लक्ष

एकीकडं बनावट कागदपत्राच्या माध्यमातून मास्टरलिस्टच्या घरांची दलाली राजरोसपणं सुरू असल्याचा गंभीर आरोप होत असताना, नुकतीच एका दलालाला अटक झाली. त्यात म्हाडा अधिकाऱ्याकडूनच मास्टरलिस्टच्या घरांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप होत असल्याने म्हाडा या प्रकरणी काय भूमिका घेतं? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.


मास्टरलिस्टच्या घरांचं वितरण हे नियमाप्रमाणेच होतं. घरांसाठी जाहिरात काढूनच पात्र अर्जदाराला घराचं वितरण केलं जातं. शिवाजी पार्कमधील घराच्या वितरणाची फाईल तपासल्याशिवाय याविषयी मला काहीही बोलता येणार नाही.

- तेजुसिंग पवार, सहमुख्य अधिकारी, दुरूस्ती मंडळ, म्हाडाहेही वाचा-

म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये मोठा घोटाळा? मूळ रहिवाशांच्या फायलीच गायब?


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा