राज्याच्या नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं मुंबईत नोकरीधंद्यासाठी दाखल होतात. यामध्ये महिलांचं देखील मोठं प्रमाण आहे. सरकारी वा खासगी कार्यलयांत काम करणाऱ्या महिलांची संख्या मुंबईत (mumbai) मोठी आहे. मुंबईतजितक्या सहजतेने काम मिळत असलं, तितक्या सहजतेने राहण्याची सोय होत नसल्याने यापैकी अनेक महिलांना निवाऱ्याचा मोठा प्रश्न सतावत असतो. अशा महिलांना दिलासा देण्यासाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने मुंबईतील ताडदेव परिसरात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडा १ हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे. यासंदर्भातील माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० खाटांची सुविधा
मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा महत्त्वूपर्ण ठिकाणांपासून हे वसतिगृह अगदी जवळ असल्याने मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. ४५० खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षात उभारले जाईल. येत्या ६ महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू केलं जाणार असल्याचंही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
या कामासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम स्वतंत्र संस्था करेल जेणेकरून त्याची गुणवत्ता व सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
(mhada to build women hostel in tardeo mumbai says maharashtra housing minister jitendra awhad)