Advertisement

आता म्हाडा बांधणार धारावीत स्कायवाॅक

सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडाकडे स्कायवाॅक बांधण्याची सोपवण्यात आली आहे. मुंबईत नवीन स्कायवॉक उभारण्याची बंद झालेली प्रक्रिया या निमित्ताने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

आता म्हाडा बांधणार धारावीत स्कायवाॅक
SHARES

रस्त्यावरील वाहतूककोंडी, गर्दीला टाळून पादचाऱ्यांना प्रवास करता यावा या उद्देशाने मुंबईत ठिकठिकाणी स्कायवाॅक उभारण्यात आले. बऱ्याच ठिकाणी हे स्कायवाॅक मुंबईकरांसाठी मदतीचे ठरत आहेत. तर काही ठिकाणी हेच स्कायवाॅक फेरीवाले, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनले आहेत. हे स्कायवाॅक उभारण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मागील काही वर्षांत आपली जबाबदारी चोख पार पाडली, असली बहुतेक ठिकाणी स्कायवाॅकची योग्य निगा राखण्यात न आल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते चिंतेचा विषयही ठरले आहेत. अशातच ही जबाबदारी आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडाकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईत नवीन स्कायवॉक उभारण्याची बंद झालेली प्रक्रिया या निमित्ताने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

कुठे बांधणार?

धारावीतील अभ्युदय बँकेपासून सेक्टर ३ पर्यंत स्कायवॉक आहे. या स्कायवॉकला जोडणाऱ्या धारावी ते माहीम रेल्वे स्थानकापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील स्कायवॉकच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा स्कायवाॅक बांधण्याची जबाबदारी म्हाडाच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या स्कायवॉकमुळे माहीम रेल्वे स्थानकातून थेट धारावीत जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. परिणामी, धारावीतील ९० फूट रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

गरज काय?

  • धारावीतील ९० फूट रस्त्यावर सतत वाहतूककोंडी असते. या भागातून रस्ता पार करणे फारच कठीण ठरते. 
  • त्यामुळे धारावीसारख्या गजबजेल्या भागात स्कायवॉक बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. 
  • महापालिकेने या भागात स्कायवॉक बांधण्यास नकार दिल्याने राज्य सरकारने ही जबाबदारी म्हाडावर सोपवली. 
  • त्यासाठी एमएमआरडीएने म्हाडाला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. 
  • त्यातून धारावीतील अभ्युदय बँक ते सेक्टर तीन या मार्गावर २९४ मीटर लांबीचा पहिल्या टप्प्यातील स्कायवॉक म्हाडाने मे २०१५ मध्ये बांधला. 
  • पण इतर स्कायवॉकप्रमाणे या स्कायवॉकचाही पूर्ण क्षमतेने वापर झाला नाही.
  • धारावीतून माहीम रेल्वे स्थानकाकडे जाणारा स्कायवॉक बांधला तरच धारावीकरांना फायदा होईल असं नंतर लक्षात आलं.
  • त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात धारावी ते माहीम रेल्वे स्थानकापर्यंतचा स्कायवॉक बांधण्याची जबाबदारी पुन्हा म्हाडावर सोपविण्यात आली आहे.
  • या टप्प्यात हा स्कायवॉक माहीम रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडण्यात येणार आहे. 
  • त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरची गर्दी टाळून थेट स्कायवॉकवरून धारावीत जाता येईल.

१५ कोटी रुपये खर्च

दुसऱ्या टप्प्यातील स्कायवॉकची एक मार्गिका माहीमच्या सेनापती बापट मार्गापर्यंत नेण्याची योजना होती. सेनापती बापट मार्गावर स्कायवॉकच्या पायऱ्या बांधण्याचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव म्हाडाने एमएमआरडीएला सादर केला होता. पण एमएमआरडीएने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता माहीम रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला हा स्कायवॉक जोडण्यात येणार असल्याचे म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. ४ जानेवारीला या कामाच्या निविदा काढण्यात येतील.



हेही वाचा-

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या कामात तब्बल 'इतके' कर्मचारी

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा