Advertisement

मेट्रो स्थानकांची मॉल्सना थेट जोडणी?

येत्या काळात मेट्रोच्या प्रवाशांना मेट्रो मार्गावरील मॉलमध्ये थेट जाता येणार आहे.

मेट्रो स्थानकांची मॉल्सना थेट जोडणी?
SHARES

मेट्रो मार्ग ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो मार्ग २ ए (डीएन नगर ते दहिसर) या दोन मार्गिका या वर्षअखेर पूर्ण होणार आहेत. तसंच, पश्चिम उपनगरातील २ मेट्रो मार्गिकांवर (Metro) स्थानकानजीकच्या मॉल, व्यावसायिक संकुल अशा विकासकामांना थेट जोडणी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (MMRDA) प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं येत्या काळात मेट्रोच्या प्रवाशांना या मार्गावरील मॉलमध्ये (Mall) थेट जाता येणार आहे.

मेट्रो स्थानक हे मॉल आणि व्यावसायिक संकुल अशा विकासकामांना थेट जोडणीसाठी खासगी विकासकांची कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली आहे. स्थानकाजवळील बहुविध सेवांच्या एकत्रीकरणासाठी सल्लागार आणि व्यवस्थापनाबाबतच्या निविदादेखील (Tender) जारी केली आहे. मेट्रो स्थानकानजिकच्या विकासकामांना स्थानकातून थेट जोडणी देण्यासंबंधीच्या धोरणास एमएमआरडीएनं (MMRDA) मागील महिन्यात मंजुरी दिली होती.

त्यासंदर्भातील नियम व इतर तपशील ठरविण्यात आले होते. त्यानुसार, या जोडणीचा पूर्ण खर्च हा जोडणी घेणाऱ्या विकासकास करावा लागणार आहे. त्याचं बांधकाम प्राधिकरणामार्फत केलं जाणार आहे. एमएमआरडीएनं मंगळवारी या संदर्भात खासगी विकासकांसोबत कार्यशाळा घेऊन नवीन कल्पना, सूचना, रेखांकन, बांधकाम आणि अटी व शर्ती याबाबत चर्चा केली.

मेट्रो स्थानकांवरील (Metro Station) प्रवेशासाठी आणि स्थानकानजीकच्या बहुविध सुविधांच्या व्यवस्थापनासाठी प्राधिकरणानं आत्तापासूनच पावले उचलली असून त्यासंदर्भात नुकत्याच निविदा काढल्या आहे. वर्षअखेर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या दोन्ही मार्गावरील एकूण ३० स्थानकांसाठी ३५६.८५ कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत.

मेट्रो स्थानकांबाहेरील सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, रिक्षा अशी खासगी वाहतूक आणि अन्य पर्यायांबाबतचे व्यवस्थापन आणि सल्लागार या निविदांमार्फत नेमण्यात येणार असल्याचं समजतं. या दोन्ही मेट्रो मार्गिका दाट शहरी वस्तीतून जात असल्यामुळे मेट्रो स्थानकांना थेट जोडणी तसेच लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी अन्य पर्यायांचे नियोजन सध्या केलं जात आहे.

भविष्यात मुंबई आणि महानगर परिसरात १४ मार्गिकांच्याद्वारे एकूण ३३७ किमीचे मेट्रोचं जाळं विणलं जाणार असून, त्यामध्ये २२५ स्थानकांचा समावेश असेल. भविष्यात इतर मार्गिका कार्यान्वित होण्यापूर्वी तेथेदेखील अशा कार्यशाळेचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

शैक्षणिक सहलींचा एसटी महामंडळाला दिलासा

दादरकरांना घराजवळ करता येणार गाड्या पार्क



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा