Advertisement

नवीन वर्षात सुरु होणार मोनोचा दुसरा टप्पा?


नवीन वर्षात सुरु होणार मोनोचा दुसरा टप्पा?
SHARES

मुंबई - वडाळा ते संत गाडगे महाराज चौकापर्यंतच्या मोनो रेलच्या दुसऱ्या
टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या टप्प्यातील शिल्लक असलेली इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.

ही कामे पूर्ण करून 26 जानेवारी 2017 पर्यंत या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. प्रतीक्षानगर येथील मोनोच्या डेपोमध्ये एमएमआरडीए
अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्यानंतर चाचणी करण्यात येणार आहे. यानंतर रेल्वे सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र जानेवारी महिन्यापर्यंत जर आले तर 26 जानेवारी 2017 रोजी या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा आमचा मानस असल्याचे एमएमआरडीएच्या
अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या टप्प्याच्या मार्गावर वडाळा ते आचार्य अत्रेनगर दरम्यान एमएमआरडीए आणि कंत्राट दिलेल्या स्कोमी कंपनीच्या वतीने मोनो रेलची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी 15 ऑगस्टला घेण्यात आली होती. या टप्प्यातील मार्गिकेचे संपूर्ण बांधकाम जरी पूर्ण झाले असले तरी इतर कामे अजून प्रलंबित आहेत. या प्रलंबित असलेल्या कामांपैकी मोनोला विद्युत पुरवठा केला जाणाऱ्या ट्रॅक्शन स्टेशनचे यापूर्वी उद्घाटन करण्यात आले आहे.

10.24 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचे काम आता पूर्ण झाले असले तरी इतर कामे सुरु असून सेफ्टी ट्रायल घेण्यात येणार आहे. यानंतर सेफ्टी सर्टिफिकेट आल्यावर या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे एमएमआरडीएने दिलेल्या या वेळच्या मुदतीमध्ये तरी हे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यात जीटीबीनगर, अॅण्टॉप हिल, आचार्य अत्रेनगर, वडाळाब्रीज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परळ, संत गाडगे महाराज चौक अशी महत्त्वाची स्थानके आहेत. तसेच काही स्थानके ही पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाला जोडणारी असल्यानं हा टप्पा सुरु झाल्यावर मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा