मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रोचे २ नवीन मार्ग सुरु होणार आहेत. या २ मार्गांवरील मेट्रो सुरु होणार असल्यानं पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई मेट्रोच्या रेड लाइन ७ अर्थात अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि येलो लाइन २ ए म्हणजे डीएनए नगर ते दहिसर या २ मार्गिका डिसेंबरपूर्वी प्रवासी सेवेसाठी खुल्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या या मेट्रो फेऱ्यांची चाचणी सुरू असून, या मेट्रो मार्गिकांमुळं मुंबईकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला होता. आता हा मार्ग डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोची चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे. एकूण २० किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या घेण्यात येणार आहेत. मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गावरील मेट्रो दोन टप्प्यात धावणार आहे. डिसेंबरमध्ये पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होईल, अशी शक्यता आहे.