Advertisement

झोपु इमारतींना त्वरित ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा


झोपु इमारतींना त्वरित ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेखाली बांधण्यात येणाऱ्या इमारतींना ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) देण्यासाठी आता म्हाडाचे अधिकारी इमारतींची अर्थात आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम झाले की नाही याची पाहणी करणार नाहीत. आता ओसीसंदर्भातील सर्व जबाबदारी, आराखड्यानुसार इमारतींचे बांधकाम करत ओसी मिळवून घेण्याची जबाबदारी प्रकल्पाच्या वास्तुविशारदाची असणार आहे. राज्य सरकारने नुकतेच या संबंधीचे एक परिपत्रक जारी केले असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे पाहणी करण्यासाठी जो वेळ लागत होता तो वेळ वाचवत ओसी शक्य तितक्या लवकर मिळवून देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर पालिकेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा -

झोपू योजनेतल्या रहिवाशांची उडाली झोप


आतापर्यंत झोपुमधील इमारतींना ओसी देण्यासाठी झोपुचे अधिकारी प्रत्येक इमारतीची पाहणी करत होते. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार घरे बांधली आहेत का? इमारतीची बांधणी आराखड्यानुसार केली आहे का? आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत का? अशा अनेक बाबींची तपासणी या अधिकाऱ्यांकडून केली जाते. या तपासणीनंतरच इमारतीला ओसी दिली जाते. इमारत बांधून झाल्यानंतर ही पाहणी-तपासणी होते. त्यामुळे त्यात बराच वेळ जातो आणि पर्यायाने ओसी देण्यास विलंब होतो. त्यामुळे ही पाहणी न करताच ओसी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्याचवेळी आराखड्यानुसार इमारतीची, प्रकल्पाची बांधणी करणे, ओसीच्या दृष्टीने सर्व बाबींची पूर्तता करणे ही जबाबदारी प्रकल्पाच्या वास्तुविशारदाची असणार असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता वास्तुविशारदच ओसीसंदर्भातील बाबींची पूर्तता करणार असून, त्यामुळे ओसी वेळेत मिळण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आराखड्यानुसार बांधकाम न झाल्याच्या वा बिल्डरने नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्यास मात्र त्याची दखल घेण्यात येणार आहे. त्यानुसार अधिकारी जाऊन इमारतींची पाहणी करतील, असेही झोपुकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा