पीएमएवायची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु

 Pali Hill
पीएमएवायची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून सर्व्हेक्षणासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचा पर्दाफाश काही दिवसांपूर्वी मुंबई लाईव्हने केला होता. या बातमीची गंभीर दखल घेत यासंबंधी म्हाडाने पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. तर काही दिवसांसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही बंद केली होती. मात्र आता पुन्हा ही अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केल्याची माहिती म्हाडाचे सचिव बी. एन. बास्टेवाड यांनी दिली आहे.

आतापर्यंत सर्व्हेक्षणासाठी 4 लाख 36 हजार अर्ज भरले गेले आहेत. हे सर्व्हेक्षण महत्त्वाचे असल्याने ही प्रक्रिया थांबवता येत नाही असे म्हणत पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र गल्लीबोळातून भरून घेण्यात येत असलेले अर्ज हे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन भरले जात नाहीत. त्यामुळे साहजिकच या अर्जांचा विचार सर्व्हेक्षणासाठी होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे असे अर्ज भरू नये असे आवाहनही बी. एन बास्टेवाड यांनी जनतेला केले आहे. आता नव्याने ही प्रक्रिया सुरू झाल्याने वार्षिक तीन लाख रूपये उत्पन्न असलेल्या आणि ज्याचे हक्काचे घर नाही त्यांनी त्वरीत सर्व्हेक्षणासाठी अर्ज भरावे, असेही आवाहन बास्टेवाड यांनी केले आहे.

Loading Comments