Advertisement

मेट्रो 2A आणि 7 मेट्रो स्टेशनवरून सायकलनं गाठा घर, कार्यालय

प्रवाशांना मेट्रो स्थानक ते घर किंवा कार्यालयापर्यंत भाड्याने सायकल सेवा उपलब्ध होणार आहे. बुधवारी आरे इथं या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं.

मेट्रो 2A आणि 7 मेट्रो स्टेशनवरून सायकलनं गाठा घर, कार्यालय
(Twitter/@MMRDAOfficial)
SHARES

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो ७) आणि दहिसर ते डीएन नगर (मेट्रो २ अ) मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गांवरील १८ मेट्रो स्थानकांवर आता ‘मायबाईक’ कंपनीच्या सायकल सेवेत आल्या आहेत.

बुधवारी या सेवेचा उद्‍घाटन सोहळा पार पडला. त्यानुसार प्रवाशांना मेट्रो स्थानक ते घर किंवा कार्यालयापर्यंत भाड्याने सायकल सेवा उपलब्ध होणार आहे. १५ तासांसाठी अवघे ३० रुपये शुल्क प्रवाशांना सायकलसाठी मोजावे लागणार आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या स्थानकांबाहेर सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मायबाईक’ कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत कंपनी प्रत्येक मेट्रो स्थानकावर किमान १० सायकल उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.


मागणीनुसार सायकलची संख्या वाढवण्यात येणार आहे. सायकलींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक जागा मेट्रो स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करारानुसार कंपनी भविष्यात मुंबईतील मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी सायकल आणि ई-सायकल सेवा पुरवणार आहे.

सायकलसाठी १५ तासांकरिता ३० रुपये शुल्क आकारण्यात येईल. स्थानकापासून नेण्यात येणारी सायकल प्रवाशांना कार्यालय किंवा घरी ठेवता येणार आहे. महिना ८०० रुपये शुल्क भरून सायकल भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठीचा दुरुस्ती खर्च कंपनी करणार आहे. सायकल प्रवाशांना ३० दिवस स्वतःकडे ठेवता येणार आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ असा दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत आला. मेट्रो २ अ मार्गावर दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, पहाडी एक्सर, कांदिवली आणि डहाणूकर वाडी, मेट्रो ७ मार्गावर आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा व दहिसर पूर्व स्थानकांदरम्यान मेट्रो चालवण्यात येत आहे.हेही वाचा

मुंबईतल्या 'या' स्थानकावर १५ दिवस लोकल ट्रेन थांबणार नाही

मुंबई मेट्रो लाइन 2A, 7 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा