Advertisement

मुंबईत कोंबड्यांचे स्वतंत्र पशुवधगृह


मुंबईत कोंबड्यांचे स्वतंत्र पशुवधगृह
SHARES

मुंबई - मुंबईतील देवनार पशुवधगृह बंद करण्याचा घाट भाजपाकडून घातला जात असतानाच आता शिवसेनेकडून स्वतंत्र कोंबड्याचे पशुवधगृह सुरू करण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. मुंबईकरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी कोंबड्यांचे मटण मिळावे यासाठी मुंबईतील हद्दीजवळ कोंबडयांचे पशुवधगृह उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या सुचनेनुसार, नव्या विकास आराखड्यात स्वतंत्र आरक्षण टाकून जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोंबड्याचा पशुवधगृह उभारण्याबाबत मागील ऑगस्ट 2016 मध्ये आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक, विकास नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी कोंबड्यांचा पशुवधगृह मुंबईच्या हद्दीजवळ असलेल्या जकात नाक्यांजवळ केल्यास कोंबड्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने वध करून मुंबईतील नागरिकांसाठी ताज्या मटणाचा पुरवठा करणे, कोंबड्याच्या वधापासून तयार होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि पर्यायाने पर्यावरणाचे वाढते प्रदुषण नियंत्रित करणे आदी बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी विकास आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबई हद्दीजवळ कोंबड्याचे पशुवधगृह उभारण्यासाठी जागेचा उपलब्धता प्रारुप विकास आराखडा 2014 मध्ये करण्यास सांगितला. त्यादृष्टीकोनातून कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा 1960 पशुवधगृह नियमावली 2001 नियम 3(1)नुसार कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचा वध अधिकृत प्रशुवधगृहामध्ये करणे बंधनकारक आहे. तसेच वध केलेल्या कोंबड्यांची पशुवैद्यकांमार्फत तपासणीही होणे बंधनकारक आहे. त्यामुळे कायदा आणि नियमानुसार मुंबईत कोंबड्यांसाठी वेगळा पशुवधगृह असणे आवश्यक आहे. देवनार पशुवधगृहातील दैनंदिन वधांची संख्या, बकरी ईद या सणासाठी पडणारी अपुरी जागा आणि कोंबड्यांची मुंबईत होणारी आवक पाहता कोंबड्यांच्या पशुवधगृहात जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबईत कोंबड्याचा पशुवधगृह बांधायचा असल्यास शहराच्या हद्दीजवळ मोकळ्या जागेत बांधणे योग्य हार्इल, असे मत प्रशासनाने व्यक्त केले होते.

महापालिका सभागृहनेत्या आणि शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या कोंबड्यांची महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत देवनार येथील पशुवधगृहात तपासणी केल्यानंतर त्यांचे मटन वेगळे करून नंतरच शहरात पाठवण्यात यावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मुंबईत दरदिवशी लाखो कोंबड्यांची विक्री करण्यात येते. परंतु याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत कोणतीही तपासणी केली जात नसल्यामुळे ‘बर्ड फ्लू’सारखा रोगाचा फैलाव होतो. तसेच पिसे आणि अन्य टाकावू अवयव गटार तथा नाल्यात टाकले जात असल्यामुळे त्याचे विघटनही होत नाही. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे एकाच ठिकाणी देवनार पशुवधगृहात कोंबड्या कापून त्यांचे मांसमटण विक्रीस उपलब्ध करून दिल्यास सांसर्गिक रोगांना आळा बसेल. तसेच कोंबड्यांची पिसे, अवयवांपासून भूकटी तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल आणि कचऱ्याचीही समस्या मिटेल. त्यामुळे नव्या विकास आराखड्यात याबाबतचे आरक्षण टाकून जागा निश्चित करण्यात येत असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा