Advertisement

म्हाडा अधिकारीच 'लाभार्थी'! मास्टरलिस्टचं घर हडपलं!!


म्हाडा अधिकारीच 'लाभार्थी'! मास्टरलिस्टचं घर हडपलं!!
SHARES

सरकारी योजनांचा लाभ मूळ लाभार्थ्यांएेवजी सरकारी अधिकारीच लाटत असल्याचा प्रकार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळात उघडकीस आला आहे. उपकरप्राप्त इमारतीतील मूळ रहिवाशांच्या घरांवर अधिकारी डल्ला मारत असून गरीबांच्या घरांचा धंदा अधिकाऱ्यांनी सुरू केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 


काय आहे प्रकार?

दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळातील एक अधिकारी श्रद्धा कुट्टपन यांची मुलगी प्रगती राजू कुट्टपन ही चक्क मास्टरलिस्टमधील घरांची लाभार्थी ठरली आहे. प्रगती कुट्टपन हिला सायन-माटुंगा विभागातील प्लाॅट क्रमांक ७, ३२१, विजया, सदन या इमारतीतील घराचं वितरण करण्यात आल्याची माहिती ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पेठे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


लाभार्थी दुसराच

या घराचे मूळ भाडेकरू जयराम पेंडसे नामक व्यक्ती असताना या घराचं वितरण प्रगती कुट्टपनला करण्यात आलं आहे. याची नोंद दुरूस्ती-पुनर्रचना मंडळाच्या अधिकृत नोंदवहीत असून या नोंदवहीतील नोंद माहिती अधिकाराखाली पेठे यांनी मिळवली आहे. यानिमित्तानं अधिकारीच कसं स्वत:च उखळ पांढरं करून घेतात हे यानिमित्तानं समोर आलं आहे.


घर कुणाच्या वाट्याचं?

उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरू जे संक्रमण शिबिरात राहतात आणि ज्यांच्या इमारतीचा भविष्यात कधीही पुनर्विकास होऊ शकत नाही, अशा भाडेकरूंना मास्टरलिस्टअंतर्गत दुरूस्ती मंडळाकडून अतिरिक्त घरांच्या कोट्यातून घराचं वितरण केलं जातं. या घराच्या वितरणाच्या प्रक्रियेनुसार मूळ भाडेकरूला, तो हयात नसेल तर त्याच्या वारसांना केलं जातं. वारसांना त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करत सक्सेशन सर्टिफिकेट मंडळाकडे सादर करावं लागतं.

असं असताना या प्रकरणात मात्र जयराम पेंडसे वा त्यांच्या वारसांएेवजी प्रगती कुट्टपनला घर देण्यात आलं आहे. प्रगती कुट्टपन ही श्रद्धी कुट्टपन यांची मुलगी असून श्रद्धा कुट्टपन सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळात कार्यरत आहेत. पण ज्या काळात हे वितरण झालं त्या काळात श्रद्धा कुट्टपन या दुरूस्ती-पुनर्रचना मंडळात कार्यरत होत्या.


कुंपणानेच शेत खाल्लं

महत्त्वाच्या म्हणजे मास्टरलिस्टमधील घरांच्या वितरणाची जबाबदारी श्रद्धा कुट्टपन यांच्याकडे होती आणि याच काळात त्यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप पेठे यांनी केला आहे. हा घोटाळा लक्षात आल्याबरोबरच काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कुट्टपन यांची बदली दुरूस्ती मंडळातून मुंबई मंडळात केल्याची चर्चा आहे.

खरेदी-विक्री दाखवणाऱ्या मास्टरलिस्टमधील अर्जदारांना दुरूस्ती मंडळ एकीकडे अपात्र ठरवत असताना प्रगती कुट्टपन यांना खरेदी-विक्री तत्वावर घराचं वितरण केलंच कसं? अधिकारी आपल्या अधिकारात काहीही करू शकतात याचंच हे उदाहरण अाहे. या प्रकरणाची चौकशीची मागणी मी गृहनिर्माण विभागाकडे केली आहे.

- अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशन  

दरम्यान श्रद्धा कुट्टपन यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'नं संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा