Advertisement

हुश्श! अखेर धारावी पुनर्विकासासाठी दोन निविदा सादर


हुश्श! अखेर धारावी पुनर्विकासासाठी दोन निविदा सादर
SHARES

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या एकत्रित  पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) कडून मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर तिसऱ्या वेळेस का होईना पण प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या मुदतवाढीत धारावी पुनर्विकासासाठी दोन कंपन्या-बिल्डर पुढे आल्याची माहिती डीआरपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळे आता या दोन कंपन्यांमधून कोण बाजी मारत आणि धारावी पुनर्विकास कुणाच्या हाती जातो हेच महत्त्वाचं ठरणार असून याचं उत्तर येत्या काही दिवसांतच मिळेल असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.


दुसऱ्या मुदतवाढीत प्रतिसाद

धारावी पुनर्विकासासाठी तब्बल तीन वेळा निविदा काढण्यात आल्या आहेत. दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या निविदेसाठी पाच वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की डीआरपीवर आली होती. तर आता हा प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देत प्रकल्पासाठी निविदा मागवल्यानंतरही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र होतं. विशेष प्रकल्पांतर्गत पहिल्यांदा डीआरपीनं निविदा मागवली, त्यावेळी केवळ एकच बिल्डर-कंपनीनं निविदा सादर केली. त्यामुळे डीआरपीनं निविदेला मुदतवाढ दिली. या मुदतवाढीतही एकच कंपनी-बिल्डर आल्यानं दुसऱ्यांदा मुदतवाढीची नामुष्की डीआरपीवर ओढावली आहे. या दुसऱ्या मुदतवाढीत तरी प्रतिसाद मिळतो का? की हा प्रकल्प पुन्हा रखडतो याकडेच अनेकांचं लक्ष लागलं होतं. 


दोन निविदा सादर

त्यानुसार मंगळवारी, १५ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती आणि यावेळी दोन निविदा सादर झाल्या नि डीआरपीनं सुटकेचा निश्वास सोडला. यावेळीही निविदेला प्रतिसाद मिळाला नसता तर निविदा रद्द करण्याची नामुष्की डीआरपीवर ओढावली जाण्याची शक्यता होती. मात्र शेवटच्या दिवशी दोन निविदा सादर झाल्या असून डीआरपीसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.


कोण बाजी मारणार?

निविदे प्रक्रियेनुसार, आता बुधवारी, १६ जानेवारीला या दोन्ही निविदा खुल्या केल्या जातील. त्यानंतर दोन्ही निविदांची छाननी करत त्यातून एकाची निवड करत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. त्यानुसार राज्य सरकार कुणाला कंत्राट द्यायचं याचा अंतिम निर्णय घेईल असंही या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारत आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प पटकावतो हे आता लवकरच समजेल.



हेही वाचा - 

मकरसंक्रात आणि मोदींची थापांची पतंगबाजी, राज ठाकरेंनी पुन्हा उडवली खिल्ली

धारावी पुनर्विकास : एक्स्टेन्शन पे एक्स्टेशन, पण निविदेला काही प्रतिसाद मिळेना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा