SHARE

'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट'च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुरूषांच्या 'अ' गटात झालेल्या सामन्यात एअर इंडिया संघाने बॉम्बे पोर्ट ट्रस्ट संघावर 34-17 गुणांनी विजय मिळवित लौकिकाला साजेसा खेळ केला.

एअर इंडियाने सामन्याच्या सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड मिळविली होती. त्याला विकास काळे याने केलेल्या पकडींची उत्कृष्ट साथ मिळाली. मध्यंतराला एअर इंडिया संघाकडे 18-9 अशी आघाडी होती. एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाई व मनोज धूल यांनी चौफेर चढाया करीत मैदान दणानून सोडले. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या शुभम कुंभार व शिवराज जाधव याने खोलवर चढाया करून विजयासाठी जिवाचे रान केले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दीपक गोरी याने काही चांगल्या पकडी घेत मोलाची साथ देण्याचा प्रयत्न केला.

तर, महिलांच्या 'अ' गटात यजमान सुवर्णयुग संघाने सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानचा 51-14 असा धुव्वा उडवित घरच्या मैदानावर शानदार विजय मिळविला. मध्यंतराला सुवर्णयुग संघाकडे 23-5 अशी भक्कम आघाडी होती. सुवर्णयुग संघातील आंतराष्ट्रीय दर्जाची खेळाडू दीपिका जोसेफ व ईश्वरी कोंढाळकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. कोमल जोरी व हर्षदा सोनवणे यांनी चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या स्पर्धेचे उदघाटन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे देखील उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या