Advertisement

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली


आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली
SHARES

आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदर संघाने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमिनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत ५१-४३ असा विजय नोंदवला. तसेच मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि बलाढ्य भारत पेट्रोलियमने देखण्या विजयासह आपले विजयी अभियान सुरू केले.

प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावर चवन्नी गल्लीत सुरू झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेने आज सारा परिसर कबड्डीमय झाला होता. आमदार चषक कबड्डी स्पर्धेने पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय लौकिकाला साजेसं आयोजन करून सर्वांचीच वाहवा मिळवली. विशेष म्हणजे स्पर्धेचा उद्घाटनीय सामना नियोजित वेळेनुसार 6 वाजता सुरू झाला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सदा सरवणकर, आयोजक आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं.


मुंबई बंदरची कमाल

एअर इंडिया आणि मुंबई बंदर यांच्यात खेळला गेलेला सामना खऱ्या अर्थाने चढउतारांचा सामना होता. शिवराज जाधव आणि गणेश डेरंग यांच्या जोरदार चढायांनी एअर इंडियावर लोण चढवत बंदराला पहिल्या १० मिनीटातच १५-१० अशी आघाडी मिळवून दिली होती. तेव्हाच एअर इंडियाच्या उमेश म्हात्रेच्या एका चढाईने सामन्याचा सारा चेहरा बदलून टाकला. त्याने एकाच चढाईत मैदानात असलेले चारही खेळाडूंना बाद करून बंदरवर अनपेक्षितपणे लोण चढवला. या चढाईमुळे पिछाडीवर असलेली एअर इंडिया मध्यंतराला २४-१७ अशी आघाडीवर पोहोचली. 

उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच तिसऱ्या मिनिटालाच त्यांनी आणखी एक लोण चढवत बंदरवर २८-२० अशी जबरदस्त आघाडी मिळवली. हा गुणफलक पाहताच एअर इंडियाचा विजय निश्चित वाटत होता. फक्त त्यांना संयमी खेळाची गरज होती. पण सामन्याने पुन्हा एकदा रंग दाखवला. 


भारत पेट्रोलियमचा जोरदार विजय

प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियमने आपली सलामी दणदणीत दिली. नितीन मदनेने प्रारंभीच एका खोलवर चढाईत युनियन बँकेच्या क्षेत्ररक्षणावर दरोडा घालत ४ गुण टिपले. मग पुढच्याच मिनिटात आकाश मुंडेने दोन गडी बाद करत युनियनवर लोण लादला. 

सामना पुर्णपणे एकतर्फी झाल्यामुळे प्रेक्षकांनी मध्यंतरापूर्वीच मैदानातून काढता पाय घेतला. निरस आणि कंटाळवाण्या सामन्यात भारत पेट्रोलियमने मध्यंतरातील २४-९ अशा आघाडीनंतर ३५-१८ असा सहज विजय नोंदवला. मध्य रेल्वेने देना बँकेचे आव्हान ४६-३६ असे परतावून लावले. रेल्वेच्या श्रीकांत जाधवने एका चढाईत टिपलेले चार गुण या सामन्याचे वैशिष्ट्य होते. गुरूविंदर सिंग आणि आतिश धुमाळ यांच्याही दमदार खेळामुळे रेल्वेने हा सामना कोणत्याही अडचणीविना जिंकला. देना बँकेकडून नितीन देशमुख आणि पंकज मोहिते यांनी चांगला खेळ केला.


महाराष्ट्र पोलिसांची बाजी

महाराष्ट्र पोलिस आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील लढतही थरारक झाली. महेश मकदूम आणि महेंद्र राजपूत यांच्या वेगवान चढायांनी महाराष्ट्र पोलिसांना मध्यंतरालाच १८-८ अशी दणदणीत आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धाच्या खेळात विराज उतेकर आणि सुरज सुतळे यांनी चांगला खेळ करून संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सामना संपायला ७ मिनिटे असताना बँक ऑफ इंडियाने भन्नाट खेळ करत १८-३१ अशा पिछाडीवरून शेवटच्या मिनिटाला खेळ ३१-३४ असा आणला. पण त्यांची धडपड वाया गेली आणि पोलिसांनी ३५-३१ अशी बाजी मारली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा