Advertisement

'मुंबई सुपर लीग' कबड्डी स्पर्धा 13 मे पासून


'मुंबई सुपर लीग' कबड्डी स्पर्धा 13 मे पासून
SHARES

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे जानेवारीत शालेय मुलांची 'हिंद करंडक कबड्डी स्पर्धा' घेण्यात आली होती. या स्पर्धेनंतर खुल्या नोंदणीद्वारे 1018 खेळाडूंची निवड चाचणी घेऊन त्यातून संघनिर्मिती करण्यात आली. या संघांमध्ये आता 'मुंबई सुपर लीग' कबड्डी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 13 मे ते 27 मे या कालावधीत वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिर येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी 12 संघ निवडण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील साखळी सामन्यांसाठी संघांची विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये लक्ष्मी टूर्स मेकर्स, अंबा शिपिंग लोडर्स, शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स; ब गटामध्ये अरुण फाऊंडर्स, संकल्प प्रतिष्ठान टायगर्स, अपना बँक मास्टर्स; क गटामध्ये व्हिबज्योर सेव्हन, सहकारी भांडार अचिव्हर्स, अपना बाजार रेडर्स आणि ड गटामध्ये सातारा बँक विनर्स, आंबेकर प्रतिष्ठान फायटर्स, निमसाई लायटर्स हे संघ असणार आहेत.

साखळी सामने चार गटांत 13, 14, 16 आणि 18 मे 2017 रोजी होतील. प्रत्येक गटातील पहिले दोन असे एकूण आठ संघ दुसऱ्या टप्प्यात स्विस-सुपर लीग पद्धतीचे सामने 23, 24 आणि 25 मे 2017 रोजी खेळतील. अंतिम टप्प्यात प्रथम व तृतीय क्रमांकाच्या लढती पॉवरप्ले संकल्पनेसह 27 मे रोजी होतील. स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांसाठी एकूण 8 रोख पुरस्कार असून प्रथम पुरस्कार रु. 30,000/- आहे. सर्वोत्तम कबड्डीपटूला क्रीडा संपादक दि. आत्माराम मोरे स्मृती चषक व रु. 3,000/- पुरस्कार असून उत्कृष्ट चढाई, पकड व प्रत्येक सामन्यासाठी दोन सामनावीर पुरस्कार दिले जाणार आहेत.

यंदा भारतीय कबड्डी संघात महाराष्ट्राचा खेळाडू नसल्यामुळे त्याबाबत बांधेसूद कार्य करण्यासाठी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे खारीचा वाटा उचलण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दर्जेदार प्रशिक्षण, सराव-स्पर्धात्मक खेळाद्वारे सबज्युनियर कबड्डीपटू घडविण्याची गरज ओळखून शालेय मुलांसाठी मुंबई सुपर लीग कबड्डी उपक्रम राबविण्यात येत आहे.

यंदा सुपर लीग कबड्डीचे पहिले वर्ष असल्यामुळे त्यात शालेय मुलांचे संघ मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंना त्यांचे शालेय कबड्डी संघ बनविण्याचे तंत्र दिले जाणार आहे. त्यायोगे येत्या बालदिनी-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 'हिंद करंडक कबड्डी स्पर्धे'मधील शाळांच्याच संघांची द्वितीय 'मुंबई सुपर लीग' कबड्डी स्पर्धा होईल. तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शालेय कबड्डी संघांना विविध स्पर्धांसाठी त्याचा लाभ होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा