Advertisement

मुंबईच्या महिला स्वराज संघाचा पुणे कबड्डी स्पर्धेत पराभव


मुंबईच्या महिला स्वराज संघाचा पुणे कबड्डी स्पर्धेत पराभव
SHARES

पुणे येथील सणस मैदानावर सुरू असलेल्या 'श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्ट'ने आयोजित केलेल्या 'राज्यस्तरीत व्यावसायिक महिला कबड्डी स्पर्धे'त तिसऱ्या दिवशी पुण्याच्या सुवर्णयुग संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य संघाचा 39-14 असा दणदणीत पराभव करीत विजयी घौडदौड सुरू ठेवली.

मध्यंतराला सुवर्णयुग संघाकडे 20- 9 अशी आघाडी होती. सुवर्णयुग संघाच्या ईश्वरी कोंढाळकर, मयुरी शिरसाठ यांच्या चौफेर चढाया व दिक्षा जोरी हिने घेतलेल्या नेत्रदिपक पकडींमुळे त्यांनी आपल्या संघाचा विजय सुकर केला. स्वराज्य संघाच्या काजल खैरे, अंजली रोकडे यांनी केलेल्या चढाया व स्मिता पांचाळ हिने काही चांगल्या पकडी घेत उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवले.

इतर सामन्यांत एमएच स्पोर्ट्स व संघर्ष उपनगर यांच्यात अत्यंत चुरशीच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात एमएच स्पोर्ट्स संघाने संघर्ष संघावर 31-27 अशी मात केली. मध्यंतराला एमएच स्पोर्ट्स संघाकडे 17-8 अशी आघाडी होती. एमएच स्पोर्ट्सच्या चैत्राली कारके व प्रतिक्षा करेकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत हा सामना जिंकला. संघर्ष संघाच्या कोमल यादव हिने चांगल्या चढाया करीत चांगला प्रतिकार केला.

जागृती प्रतिष्ठानने वाघेश्वर संघावर 23-21 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला जागृती प्रतिष्ठानकडे 12-8 अशी आघाडी होती. जागृती प्रतिष्ठानच्या ऋतिका होनमाने व सिद्धी पोळ यांनी केलेल्या चढाया आणि चैत्राली मसूरकर हिने घेतलेल्या पकडींच्या जोरावर त्यांना हा सामना जिंकता आला. वाघेश्वर संघाच्या पूजा भंडलकर व श्रध्दा चव्हाण यांच्या चढाया व सायली कोतवालच्या पकडीमुळे सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. मात्र हा सामना आपल्या पारड्यात खेचण्यात त्यांना अपयश आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा