मंबई उपनगरच्या निकिता उतेकर ठरली उत्कृष्ट खेळाडू

 Mumbai
मंबई उपनगरच्या निकिता उतेकर ठरली उत्कृष्ट खेळाडू

राज्यस्तरीय पुरूष आणि महिला गटांतील कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटांत महात्मा फुले स्पोर्टस् क्लब, मुंबई उपनगर, छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली, शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर आणि होतकरू मित्र मंडळ, ठाणे या संघानी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्यावतीने आयोजित करण्यात अालेल्या या स्पर्धेतील महिला गटातील सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा फुले स्पोर्टस् क्लब संघाने मुंबई उपनगरच्या आराध्य सेवा संघाचा 31-21 असा 10 गुणांनी पराभव केला. मध्यंतराला महात्मा फुले स्पोर्टस् क्लब संघाने निकीता उतेकरच्या चौफेर चढाया आणि प्रगती फणसे हिच्या सुंदर पकडीमुळे 19-11 अशी 8 गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर आराध्य सेवा संघाच्या रूपाली वाड हिने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली पण ती संघाचा पराभव टाळू शकली नाही. तर महिला गटातील दुसऱ्या सामन्यात डोंबिवलीच्या छत्रपती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या संजिवनी क्रीडा मंडळाचा 43-18 असा 25 गुणांनी पराभव केला. मध्यंतराला छत्रपती क्रीडा मंडळाने स्वप्ना साखळकर, श्वेता राणे यांच्या अष्टपैलू खेळामुळे 22-6 अशी विजयी आघाडी घेतली.

पुरूष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळ संघाने ठाण्याच्या वेताळ क्रीडा मंडळ संघाचा 30-25 असा 5 गुणांनी पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला स्वस्तिक क्रीडा मंडळ संघाने अक्षय बर्डे आणि सिद्धेश पांचाळ यांच्या सुंदर खेळामुळे 6-12 अशी 4 गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मात्र वेताळ क्रीडा मंडळ संघाच्या संदेश म्हात्रे याने अतिशय आक्रमक खेळ केला. मात्र तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.

उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरूष गटात नवी मुंबर्इच्या ग्रीफिन जिमखाना संघाचा श्री विनोद दोरणे, तर महिला गटात मंबई उपनगरच्या महात्मा फुले स्पोर्टस् क्लब संघाची निकिता उतेकर हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

Loading Comments