आगरी कबड्डी स्पर्धेत साईराज, साईनाथचे दमदार विजय


SHARE

सागर आगटेच्या तुफानी चढायांच्या बळावर ४ गुणांच्या पिछाडीनंतरही ओम साईनाथ सेवा ट्रस्टने हिंद केसरी मंडळाचा २९-२० असा पराभव करून आगरी महोत्सव कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साईराज क्लबने अमरसुभाष क्रीडा मंडळाचा तर एकता संघाने दिलखुशवर मात करीत दणदणीत विजयाची नोंद केली.


सागर अागटेच्या सुरेख चढाया

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानातील किरण पाटील क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशीही जोरदार लढती झाल्या. ओम साईनाथ आणि हिंद केसरी यांच्यात झालेला सामना चांगलाच रंगला. उत्तरार्धात ओम साईनाथच्या सागर आगटेने एकाच चढाईत तीन गडी बाद करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्याला सिद्धेश राऊतची भन्नाट साथ लाभली आणि त्यांनी उत्तरार्धात तब्बल 19 गुणांची कमाई करीत हिंद केसरीला पराभूत केले.


साईराजचा सचिन धुरी चमकला

साईराज क्लबने सचिन धुरीच्या वेगवान चढायांच्या बळावर अमर सुभाषचा ३५-२९ असा पाडाव केला. मध्यंतराला साईराजने १९-७ अशी जबरदस्त आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात मनोज डांगेने जोरदार खेळ करीत संघाची पिछाडी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. एकता संघानेही शुभम पाटील आणि सुधीर सावंतच्या पल्लेदार चढायांमुळे दिलखुशचे आव्हान ४०-३५ असे मोडीत काढून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.


हेही वाचा -

प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!

संबंधित विषय
ताज्या बातम्या