Advertisement

प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!


प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!
SHARES

आगरी कबड्डी महोत्सवाच्या निमित्तानं किरण पाटील क्रीडानगरीत पुन्हा एकदा कबड्डीचा थरार प्रभादेवीकरांना अनुभवायला मिळणार आहे. आपल्या अनोख्या बक्षिसांमुळे कबड्डी संघांचे लक्ष वेधणाऱ्या या स्पर्धेत बोकडाची पार्टी करण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेऊनच १६ द्वितीय श्रेणीचे संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. मटण बिर्याणी आणि चिकन बिर्याणीची पार्टी करण्याच्या मूडच सहभागी १६ संघांमध्ये दिसत असल्यामुळे प्रभादेवीत एक अनोखी कबड्डी पाहायला मिळणार अाहे.


उपविजेत्या संघाला १० कोंबड्या

कबड्डी संघांप्रमाणे कबड्डीप्रेमींमध्येही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या आगरी मंडळाच्या आगळ्यावेगळ्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेला मोठ्या दणक्यात सुरूवात झाली. यंदाही विजेत्या संघाला माजलेला बोकड पुरस्कार रूपाने दिला जाणार असून उपविजेत्या संघाला १० गावठी कोंबड्यावर समाधान मानावं लागणार आहे. २६ एप्रिलपर्यंत रंगणाऱ्या या धम्माल कबड्डी स्पर्धेची सुरुवात जय ब्राह्मणदेव आणि छत्रपती शिवाजी मंडळातील जोरदार लढतीने झाली.


ही असतील बक्षिसं...

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आगरी मंडळाने विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख रकमांच्या पुरस्कारासह बोकड आणि गावठी कोंबड्या जाहीर केल्या आहेत. दररोज जोरदार आणि दमदार खेळ करणाऱ्या खेळाडूला गावठी कोंबडीचा पुरस्कार दिला जाईल. सर्वोत्तम पकड, सर्वोत्तम चढाई आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूलाही कोंबडी बक्षिस दिली जाईल. या स्पर्धेत मध्यंतराला दोन्ही संघांना उकडलेली अंडी दिली जातील.


१६ संघांना प्रवेश

या स्पर्धेची क्रेझमुळे द्वितीय श्रेणीतील तब्बल ६० संघांनी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र १६ संघांना स्थान देताना आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागली. या स्पर्धेत प्रभादेवीतील संस्कृती, विकास, ओम श्री साईनाथ, गणेशकृपा, दादरमधील बालमित्र, अमर सुभाष, लोअर परळचे भवानीमाता, साई के दिवाने, हिंद केसरी असे द्वितीय श्रेणीतील तगडे संघ जेतेपदाच्या बोकडासाठी आपले कौशल्य पणाला लावतील.


हेही वाचा -

प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

महाराष्ट्रानं पटकावलं ११ वर्षानंतर राष्ट्रीय कबड्डीचं जेतेपद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा