संकल्प प्रतिष्ठानचा सनसनाटी विजय

  wadala
  संकल्प प्रतिष्ठानचा सनसनाटी विजय
  मुंबई  -  

  मुंबई सुपर लीग शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेतील सुपर-स्वीस लीगमध्ये संकल्प प्रतिष्ठान टायगर्स संघाने सहकारी भांडार अचिव्हर्स संघाविरुद्ध 57-55 असा सनसनाटी विजय मिळविला. संकल्प प्रतिष्ठान टायगर्सची पहिल्या डावातील 14 गुणांची पिछाडी भरून काढत चढाईपटू तेजस शिंदे, ओमकार तवसाळकर, साईल सारंग यांनी सामना फिरविला. मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अन्य साखळी सामन्यांत शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स, आंबेकर प्रतिष्ठान फायटर्स, व्हिबज्यॉर सेव्हन संघांनी पहिला विजय नोंदविला.

  वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात सुरु असलेल्या शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डीमधील संकल्प प्रतिष्ठान टायगर्सविरुद्ध सहकारी भांडार अचिव्हर्स यामधील लढत चुरशीची झाली. चढाईपटू सूरज मिश्राच्या चौफेर चढायामुळे सहकारी भांडार अचिव्हर्स संघाने रुपेश बंदरकर व गोविंद तुनागारीया यांच्या साथीने मध्यंतराला 37-23 अशी मोठी आघाडी घेतली.

  दुसऱ्या डावात मात्र चढाईपटू तेजस शिंदे, ओमकार तवसाळकर, साईल सारंग यांनी जोरदार मुसंडी घेतली आणि भराभर गुण घेत संकल्पची पिछाडी भरून काढली. शेवटच्या दोन मिनिटाला आघाडीची स्थिती दोलायमान झाली. सहकारी भांडारचा सूरज शेवटची चढाई करीत असताना संकल्प प्रतिष्ठानकडे एका गुणाची आघाडी आणि केवळ दोन बचावपटू शिल्लक होते. त्या चढाईत सूरजने एकाला बाद करून दुसऱ्यालाही टिपण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्य रेषेजवळ दोघांनी सूरजची अप्रतिम पकड केली आणि संकल्प प्रतिष्ठानला सामना 57-55 अशा गुणांनी जिंकून दिला. अशा प्रकारे सहकारी भांडार अचिव्हर्स संघाच्या हातून लोण मारण्याची संधी हुकली आणि विजयाऐवजी चुटपुटणारा पराभव स्वीकारावा लागला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.