बीच कबड्डीत सिद्धीप्रभा, विजय क्लब यांच्यात अंतिम घमासान


SHARE

जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या बीच कबड्डी स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात खेळवण्यात अालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिद्धीप्रभाने साईराज संघाला ४५-३६ असे पराभूत करत दिमाखात अंतिम फेरीत मजल मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजय क्लबने गुड माॅर्निंग क्लबला चुरशीच्या सामन्यात ३९-३७ असे हरवून अंतिम फेरी गाठली. अाता सिद्धीप्रभा अाणि विजय क्लब यांच्यात अंतिम घमासान रंगणार अाहे.


अोमकार, अनिकेत विजयाचे शिल्पकार

सिद्धीप्रभाने भलेही साईराज संघावर वर्चस्व गाजवले तरी अोमकार ढवळे अाणि अनिकेत भेलसेकर यांनी सुरुवातीपासूनच सुरेख खेळ करत सिद्धीप्रभाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या विजयाचे श्रेय ओमकार ढवळे, अनिकेत भेलसेकर यांच्या चतुरस्त्र खेळाला जाते. साईराजचा सुशांत रामाणे एकाकी लढला. त्याअाधी सिद्धीप्रभाने विकास संघावर ३६-३१ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.


विजय क्लबचा विजयोत्सव

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात विजय क्लबने गुड मॉर्निंगला ३९-३७ असे २ गुणाने नमवित अंतिम फेरी गाठली. या विजयात अभिषेक रुपनर, रोशन थापा यांनी झंझावाती खेळ केला. गुड मॉर्निंगच्या प्रणव भादवणकरने संघाला विजयी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.पण अन्य कोणाची त्याला साथ न लाभल्याने तो संघाचा पराभव टाळण्यात असमर्थ ठरला.


हेही वाचा -

बीच कबड्डीत अमर संदेश, विकास, साईराजची विजयी सलामी

प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

संबंधित विषय
ताज्या बातम्या