Advertisement

उत्सुकतेचा फुटणारा फुगा...आपला मानूस!

अजय देवगणचं प्रॉडक्शन आणि सतिश राजवाडे सारख्या उत्तम दिग्दर्शकाचा 'टच' असलेला 'आपला मानूस' हा रहस्यपट येतोय म्हटल्यावर साहजिकच तुमच्या अपेक्षा उंचावल्या असतील. पहिल्या २ तासांमध्ये तुमच्या अपेक्षा पूर्णही होतील. पण शेवटच्या अर्ध्या तासात मात्र तुमची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही.

उत्सुकतेचा फुटणारा फुगा...आपला मानूस!
SHARES

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग झाले. पण, रहस्यपट मात्र फारसे आले नाहीत. किंबहुना गेल्या काही वर्षांमध्ये मराठी प्रेक्षकांनी मराठी रहस्यपट पाहिलेच नाहीत. त्यामुळे अजय देवगणचं प्रॉडक्शन आणि सतिश राजवाडे सारख्या उत्तम दिग्दर्शकाचा 'टच' असलेला 'आपला मानूस' हा रहस्यपट येतोय म्हटल्यावर साहजिकच तुमच्या अपेक्षा उंचावल्या असतील. पहिल्या २ तासांमध्ये तुमच्या अपेक्षा पूर्णही होतील. पण शेवटच्या अर्ध्या तासात मात्र तुमची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही.

चित्रपटाची सुरूवात तुफान पावसाने होते. एका इमारतीवरून एक व्यक्ती थेट खाली पडते आणि रपरप पावसात सिनेमाला सुरुवात होते. हा अपघात असावा म्हणून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होतो. केस क्राईम ब्रांचकडे सोपवली जाते. केसचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रांचचा विशेष अधिकारी अर्थात नाना पाटेकर यांची नेमणूक होते. आणि पुढे तपास कसा होतो? कशी वळणं घेतो? आणि शेवटी नवीनच काहीतरी समोर येतं, असा रहस्यमयी प्रवास करत सिनेमा शेवटाला येतो. ही संपूर्ण कथा चार व्यक्तीरेखांभोवती फिरते. एक राहुल गोखले(सुमित राघवन), भक्ती गोखले (इरावती हर्षे) राहुलचे वडील आबा गोखले (नाना पाटेकर) आणि अर्थात क्राईम ब्रांचचा अधिकारी मारूती नागरगोजे(पुन्हा नाना पाटेकर!).



सिनेमाच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर दुहेरी भूमिकेत असल्याचं आपल्याला समजतं. राहुलच्या बाबांच्या भूमिकेनंतर क्राईम ब्रांचचा अधिकारी म्हणून मारूती नागरगोजे उर्फ नाना पाटेकर ही केस आपल्या हातात घेतात आणि इथेच सुरूवात होते या कथेतील रहस्यांना.



इमारतीवरून उडी मारणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून राहुलचे वडील आबाच असतात. आधी ही आत्महत्या आहे असं दाखवत तो राहुल आणि भक्ती या दोघांमुळे आबांनी आत्महत्या केल्याचा आरोप मारूती नागरगोजे करतो. त्यासाठी योग्य पुरावेही सादर करतो. त्याक्षणी आपल्याला या दोघांच्या वागण्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं वाटायला लागतं, पटायला लागतं. त्यानंतर मारूती नागरगोजे ही आत्महत्या नसून खून असल्याची शक्यता व्यक्त करतो आणि संशयाची सुई राहुलची बायको भक्तीवर जाते. यावेळी भक्तीच्या विरोधात भक्कम पुरावेही मारुतीकडे असतात. मात्र, हा खून भक्तीने केला नसल्याचं लक्षात येताच नागरगोजे आपला मोर्चा राहुलकडे वळवतो. मारूती नागरगोजेची पुरावे गोळा करण्याची पद्धत, त्याच्या तोंंडी असलेली वाक्य यामुळे चित्रपट चांगली पकड घेतो. आपणही आपसूकच या इन्व्हेस्टिगेशनमध्ये गुंतत जातो. पावलोपावली आपल्याला मारूती नागरगोजेचं म्हणणं पटत जातं. पण शेवटी टाकलेला अनाकलनीय (रहस्यपट असल्यामुळे इथे अनपेक्षित असायला हवं होतं!) ट्विस्ट गेल्या दोन तासांचा चित्रपटाचा प्रभाव गढूळ करतो.

या चित्रपटात लक्षात राहताता ते नाना पाटेकर यांच्या तोंडी असणारे डायलॉग्ज. 'हा सैतान या बाटलीत मावनार नाय', ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा करावा, आपण काही गांधी नाही’ असे नानांचे डायलॉग गंभीर वातावरणातही प्रेक्षकांची वाहवा मिळवून जातात. नानांच्या दमदार अभिनयाला सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांची तेवढ्याच ताकदीची साथ लाभली आहे. आणि त्यात क्रीम ऑन द केक म्हणून या तिघांच्या परफॉर्मन्सला सतिश राजवाडेंचं तोडीस तोड दिग्दर्शन!



चित्रपटातील रहस्य आणि त्यातल्या स्टारकास्टप्रमाणेच जमेची बाजू आहे ती म्हणजे सतिश राजवाडे यांचं दिग्दर्शन! एखादा रहस्यपट दिग्दर्शित करताना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या दिग्दर्शनातून समोर येतात. परफेक्ट लोकेशन्स आणि मोजकं संगीत रहस्यपटाला साजेशा झाल्या आहेत. नानांनी उभा केलेला मारुती नागरगोजे आपल्याला दोन तास खिळवून ठेवतो.

आता दोन तास एवढं सगळं रहस्य आणि उत्सुकता ताणून धरल्यानंतर शेवटी काहीतरी 'भारी' आणि भन्नाट क्लायमॅक्सच्या तयारीत प्रेक्षक येतात. पण तिथेच हा चित्रपट तुमची निराशा करतो. शेवटच्या १८ मिनिटांमध्ये गेले २ तास खिळवून ठेवलेला प्रेक्षक सैल पडतो. रहस्यमयी क्लायमॅक्सच्या तयारीत असलेल्या प्रेक्षकांना टिपिकल एण्ड पहायला मिळतो. शिवाय, अजय देवगण स्वत: उपलब्ध असताना फक्त शेवटच्या दोन मिनिटांसाठी त्याचा वापर करणं म्हणजे त्याचा उपयोग करण्याची चांगली संधी दवडण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे हा उगीच उगवलेला अजय देवगण प्रेक्षकांना डिस्टर्ब करतो!

असं असलं, तरी नाना पाटेकर यांचा उत्कृष्ट अभिनय, खुर्चीला खिळवून ठेवणारा थरार, क्लायमॅक्स पाहण्याची प्रचंड उत्सुकता आणि सतिश राजवाडे यांचा स्पेशल 'टच' यासाठी हा चित्रपट एकदा चित्रपटगृहात जाऊन बघायला हरकत नाही.



Movie - Aplaa Manoos

Actor - Nana Patekar, Sumit Raghvan, Irawati Harshe

Ratings - 3/5

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा