प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...असं म्हणत प्रत्येक तरुण-तरुणी हा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा करण्याच्या मूडमध्ये आहेत. आणि अशा मूडमध्येच एक मस्त रोमॅन्टिक साँग लाँच करण्यात आलं आहे. 'असेही एकदा व्हावे' या चित्रपटातील 'भेटते ती अशी' हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट येत्या ६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात उमेश कामत आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. झेलू एंटरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'भेटते ती अशी' हे रोमँटिक गाणं चित्रपटाचा नायक उमेश कामतवर दिग्दर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात उमेशचा रोमँटिक अंदाज त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. उमेश - तेजश्रीची केमिस्ट्री मांडणारं हे गाणं, वैभव जोशीने स्वरबद्ध केलं असून अवधूत गुप्ते यांनी स्वतः हे गीत गायलं आहे.