Advertisement

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत
SHARES

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला बाहुबली लवकरच मराठीत पाहता येणार आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.

अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.

बाहुबलीच्या मराठी वर्जनबद्दल बोलताना ‘शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा म्हणाले की, “भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे बाहुबली हा चित्रपट. या चित्रपटानं फक्त कमाईचे नाही तर लोकप्रियतेचाही उच्चांक गाठला आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी रसिकांसाठी मराठी रूपात, मराठी आवाजात आपल्या मराठी भाषेच्या लहेजात आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे'.

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या संकल्पनेचं स्वागत करताना भव्यतेसोबत मराठी भाषेचा लहेजा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं? हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीनं पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मला याचा महत्त्वपूर्ण भाग होता आल्याचं समाधान अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे व्यक्त केलं आहे.

गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा गंध असणार आहे हे नक्कीच प्रत्येकाला सुखावणारे आहे. आतापर्यंत आपण बाहुबलीचं वैभव पाहिलंय आता ते आपल्यास ऐकायला मिळेल, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं सांगितले. याचं लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.

कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.हेही वाचा

ओ माय गॉड! चित्रपटाच्या सेटवर क्रू मेंबर कोविड पॉझिटिव्ह

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा