Advertisement

२८ वर्षांनी पुन्हा मराठीकडे वळले बप्पीदा


२८ वर्षांनी पुन्हा मराठीकडे वळले बप्पीदा
SHARES

वेगळ्या धाटणीचा आवाज आणि अनोखी गायनशैली या वैशिष्ट्यांखेरीज अंगभर सोनं घालण्याच्या आवडीमुळेही कायम चर्चेत राहणारे गायक-संगीतकार बप्पी लाहिरी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. संगीतप्रेमींच्या लाडक्या बप्पीदांनी २८ वर्षांनी ‘लकी’या आगामी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.


'या' चित्रपाट गाणार गाणं

४५ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले आहेत. आता त्यांनी २८ वर्षांनंतर पार्श्व गायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या चित्रपटात बप्पीदांचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे.

नुकताच दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातील या नव्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. हे गाणं संगीतकार अमितराजने संगीतबद्ध केलं आहे, तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणं गायलं आहे.


'ही'च दिवाळीतील मोठी भेटवस्तू

रेकॉर्डिंग झाल्यावर बप्पीदांचा भरभरून आशिर्वाद मिळालेला संगीतकार अमितराज म्हणाला की, यंदाची दिवाळी माझ्या करीयरमधली सर्वाधिक आठवणीतली ठरली आहे. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते, तेव्हा ती दिवाळीतील सर्वात मोठी भेटवस्तू असते.


मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने दिली ओळख

गाण्याच्या रेकॅार्डिंगनंतर आपल्या भावना व्यक्त करताना बप्पीदा म्हणाले की, मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडतं. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजा ठाकुर यांच्या ‘जख्मी’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने माझं करीयर सुरू झालं आणि मी ‘लकी’ ठरलो.


ओठांवर रुळणारं गाणं

मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यग्रतेमुळे काम करू न शकल्याची खंतही बप्पीदांनी व्यक्त केली. तरीही १९९० ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधवच्या सिनेमामुळे मराठीत परतल्याचा त्यांना आनंदही आहे. अमितराजने गाण्याला दिलेली चालही त्यांना खूप आवडली आहे. पटकन ओठांवर रुळेल, असं हे गाणं आहे.


'आम्ही खूप लकी'

बप्पीदांच्या मराठीतील पुनरागमनाबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणाला की, आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणं गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर ते नव्वदीच्या दशकातले खूप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाव्दारे आपण मराठी सिनेसृष्टीत घेऊन येत असल्याचा अभिमान संजयला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा