SHARE

गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्माल मस्ती प्रेक्षकांना आगामी ‘बॉईज २’ या सिनेमातही पाहायला मिळणार आहे. ‘बॉईज’ या सिनेमाला मिळालेल्या यशनंतर ‘बॉईज २’च्या रूपात या सिनेमाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे.

इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं आहे. 


हाईट छोटी, फाईट मोठी

‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर ‘बॉईज’ सिनेमातील तीच अतरंगी पोरं दिसतात. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून कमी झाली नसल्याचं, त्यांच्या हास्यातून जाणवतं.

कधी होणार प्रदर्शित?

विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड, प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं संवादलेखन ऋषिकेश कोळीने लिहिले असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

इरॉस इंटरनेशनलच्या माध्यमातून ‘बॉईज २’ चित्रपटाचं जागतिक स्तरावर वितरण देखिल केलं जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या