Advertisement

सावध राहा, काळजी घ्या

इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचे फायदे-तोटे आणि ते वापरण्याबाबतच्या सावधगिरीच्या सूचना जाणून घ्यायला हव्यात. जे असं करत नाहीत त्यांना सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतो. टेक केअर, गूड नाईट या सिनेमाची कथाही अशाच एका कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे.

सावध राहा, काळजी घ्या
SHARES

दैनंदिन जीवनात वावरताना नकळतपणे आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, ज्या पुढे आपल्यावर पश्चातापाची वेळ आणतात. लहानसहान गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण नंतर त्याच गोष्टी आपल्याला नुकसान पोहोचतात. मग त्या मानसिक असोत, शारीरिक असोत वा आर्थिक असोत... लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या गिरीश जयंत जोशी यांनी टेक केअर, गूड नाईट या सिनेमात फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

जगासोबत आपणही बदलण्याची गरज आहे. स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी घडणारे बदल स्वीकारायला हवेत. इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचे फायदे-तोटे आणि ते वापरण्याबाबतच्या सावधगिरीच्या सूचना जाणून घ्यायला हव्यात. जे असं करत नाहीत त्यांना सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतो. या सिनेमाची कथाही अशाच एका कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे.

आपल्याला काही नवीन शिकायचं नाही, स्वत:मध्ये बदल घडवायचा नाही. कारण आज जे बदलणार ते नंतर कालबाह्य होणार म्हणून नवीन काहीही शिकाच कशाला अशा मनोवृत्तीचा असलेल्या अविनाश (सचिन खेडेकर) आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे. नवीन स्वाॅफ्टवेअर शिकावं लागेल म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेणारा अविनाश पत्नी आसावरीसोबत (इरावती हर्षे) १५ दिवसांच्या युरोप टूरवर जातो. टूरवरून घरी परतत असतानाच त्याला आपल्या खात्यातील ५० लाख रुपयांची चोरी झाल्याचं समजतं. त्यासाठी तो मित्र मोहनसोबत (विद्याधर जोशी) सायबर इन्स्पेक्टर पवारांना (महेश मांजरेकर) भेटतो. अविनाशने आपली मुलगी सानिकाला (पर्ण पेठे) पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असतं. तरीही ती स्वत:ला एकाकी समजत असते. त्यातूनच कुतूहलापोटी तिच्याकडून एक असं कृत्य घडतं ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला नव्या संकटाला सामोरं जावं लागतं. इन्स्पेक्टर पवार कशाप्रकारे या गुन्ह्याचा छडा लावतात आणि या प्रवासात त्या कुटुंबाला कशा प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्याची कथा या सिनेमात आहे.

सिनेमाचा विषय ज्वलंत असला तरी पटकथेची बांधणी करताना बऱ्याच उणीवा राहिल्या आहेत. आजही बऱ्याच कुटुंबाना अशा प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागत असल्याचं आपण वाचतो. आपण स्वत: किंवा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अजाणतेपणे ईमेल, पासवर्ड, ओटीपी, अकाऊंट नंबर अशा काही गोपनीय गोष्टी इंटरनेट हॅकर्सना उपलब्ध करून देत असल्यामुळेच सायबर गुन्हे घडत असतात. 

या सर्व गोष्टींची योग्य काळजी घेतली आणि येणाऱ्या कोणत्याही अनोळखी ईमेल, एसएमएस किंवा काॅलकडे चिकित्सक बुद्धीने पाहत शहानिशा करूनच पावलं टाकली तर अशा गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो हा साधा-सोपा उपायही या सिनेमात सुचवण्यात आला आहे.

खरं तर या सिनेमात दोन मुली आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचाही एक वेगळा ट्रॅक आहे. एक आईवडील जे आपल्या मुलीला मोकळीक देतात, ज्याचा ती कशा प्रकारे गैरफायदा घेते आणि संकटात सापडते. दुसरे आईवडील आपल्या मुलीवर अनेक बंधनं लादतात, तरीही ती त्यांनाच धडा शिकवण्यासाठी गुपचुपपणे सर्व काही करून मोकळी होते. अशावेळी पालकांनी नेमकं करायचं काय? हा पेचही यात आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ सायबर गुन्ह्यांची उकल करणारा न राहता आईवडील आणि मुलं यांच्यातील मानसिक लढाईची कथा सांगणाराही बनतो. लहानसहान दृश्यांमध्येही सस्पेंस निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. यात संकलकाची कमाल जाणवते. 

सुरुवातीपासूनच सिनेमा वेगात सुरू होतो. मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी पकड जमवत उत्कंठा वाढवतो, पण मध्यंतरानंतर भूतकाळात डोकावताना कथेचा वेग मंदावतो. काही गोष्टींची गफलतही झाली आहे. इन्स्पेक्टर पवार जेव्हा सानिका आणि तिच्या कुटुंबियांना गुन्हेगाराचं काढलेलं स्केच दाखवतात, तेव्हा तो मिळता जुळता असल्याचं ती सांगते. पण नंतर तिच्या चॅट्मध्ये त्याचा स्पष्ट दिसणारा फोटो पहायला मिळतो.

 आपण जे केलं ते पूर्ण शुद्धीवर असताना केलं हे अभिमानाने सांगणारी सानिका गुन्हेगाराचा स्केच पाहताना त्याचा फोटो आपल्याकडे आहे हे सांगायला विसरते. चोर-पोलिसांचा पाठलाग प्रभावी वाटत नाही. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा सक्षम आहे.सचिन खेडेकर यांनी पुन्हा एकदा सुरेख अभिनय केला आहे. त्यांना इरावती हर्षे यांनी अत्यंत मोलाची साथ दिली आहे. पर्ण पेठेने एका गोंधळलेल्या मुलीची भूमिका ताकदीनिशी साकारली आहे. महेश मांजरेकरांनी साकारलेला इन्स्पेक्टर त्यांनी आजवर साकारलेल्या पोलिसांपेक्षा वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा आहे. आदिनाथ कोठारेने वठवलेला खलनायक चांगला झाला असला तरी, त्याच्या भूमिकेतील सस्पेंस खूपच लवकर ओपन केल्याने त्यातील गंमत निघून जाते. विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर, संस्कृती वालगुडे, जयवंत वाडकर यांनीही चांगलं काम केलं आहे.

ज्वलंत सामाजिक विषयावर आधारित असलेला हा सिनेमा केवळ आर्थिकच व्यवहार करतानाच नव्हे, तर भावनिक संबंध जोडतानाही योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देतो. त्यामुळे हा सिनेमा एकदा तरी पाहायला हवा.

दर्जा : *** 

..................................................

 चित्रपट : टेक केअर, गुड नाईट (टीसीजीएन)

निर्माता : हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट), महेश वामन मांजरेकर

लेखक-दिग्दर्शक : गिरीश जयंत जोशी

कलाकार : सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, जयवंत वाडकर,
                विद्याधर जोशी, संस्कृती बालगुडे, सुलेखा तळवलकरहेही वाचा- 

सुबोधच्या ‘घाणेकर’ची नवी झलक

सचिन पिळगांवकर ट्रोल, 'मुंबई अँथम' यु ट्यूबवरून गायब
संबंधित विषय
Advertisement