Advertisement

सुबोधच्या ‘घाणेकर’ची नवी झलक


सुबोधच्या ‘घाणेकर’ची नवी झलक
SHARES

अभिनेता सुबोध भावे सध्या भलताच फार्मात आहे. ‘पुष्पक विमान’ हा सुबोधचा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून, या आठवड्यात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होत आहे. छोट्या पडद्यावरील सुबोधची ‘तुला पाहते रे’ ही नवी मालिकाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील 'कोहिनूर' असं वर्णन करता येईल, असे अभिनेते डाॅ. काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमधील घाणेकरांच्या रूपातील सुबोधची नवी झलक नुकतीच रिलीज करण्यात आली आहे.


दुसरी झलक

वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ बायोपिक्स आता मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. ‘आणि... डॉ.काशिनाथ घाणेकर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली होती. आता सोशल मीडियाद्वारे त्याची दुसरी झलक प्रदर्शित झाली आहे.


काम बघता आलं नाही

डॉ. घाणेकरांची भूमिका पडद्यावर साकारण्याबद्दल बोलताना सुबोध म्हणाला की, ''मी लहानपणापासून रंगभूमीवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांविषयी ऐकत आलो आहे, परंतु रंगभूमीमध्ये जास्त रस नसल्यामुळे मी त्यांची काम पाहू शकलो नाही. परंतु त्यांच्या विषयी माझ्या मनात विलक्षण आदर होता. या सर्वांचं काम मी बघू शकलो नाही याची खंत आयुष्यभर राहील. या सिनेमाच्या निमित्ताने, डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांचं काम जाणून घेता आलं. या चित्रपटामध्ये काम केल्यामुळे मला मराठी रंगभूमीवर परत आल्यासारखं वाटत आहे.''


उदय अन् अस्त

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरीत्या बदलून टाकला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचं आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार आहे.



हेही वाचा-

सचिन पिळगांवकर ट्रोल, 'मुंबई अँथम' यु ट्यूबवरून गायब

Exclusive: अबब, ३०० किलोंची नाजूका बनली दिग्दर्शिका!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा