Advertisement

Exclusive: अबब, ३०० किलोंची नाजूका बनली दिग्दर्शिका!

‘माझा अगडबम’ या सिक्वेलच्या निमित्ताने नाजूका पुनरागमन करत आहे. पुन्हा नाजूकाची भूमिका साकारतानाच तृप्ती भोईरने या सिनेमाद्वारे दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं आहे.

Exclusive: अबब, ३०० किलोंची नाजूका बनली दिग्दर्शिका!
SHARES

नाजूका म्हटलं की साधारणपणे एखादी नाजूक चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ तरुणी आपल्या डोळ्यांसमोर येते. देखणी, गोड गळ्याची, स्लीम-ट्रीम अशी काहीशी नाजूकाची व्याख्या कोणाच्याही मनात असू शकते. पण आपण ज्या नाजूकाबाबत बोलत आहोत ती तब्बल ३०० किलोंची आहे.

होय, ही तीच नाजूका आहे, जी ८ आॅक्टोबर २०१० ला प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या मराठी सिनेमात दिसली होती. ‘माझा अगडबम’ या सिक्वेलच्या निमित्ताने नाजूका पुनरागमन करत आहे. पुन्हा नाजूकाची भूमिका साकारतानाच तृप्ती भोईरने या सिनेमाद्वारे दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं आहे. यावर तृप्तीने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझिव्ह बातचीत करत मनमोकळ्या गप्पा मारल्या.सात वर्ष लागली

जवळजवळ सात वर्षांनी ‘माझा अगडबम’ या सिनेमात पुन्हा नाजूका बनल्याचा खूप आनंद होत आहे. या नाजूकावर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं ती परतली आहे. खरं तर हा सिनेमा बनवणं हे पूर्वीही खूप मोठं आव्हान होतं आणि आजही आहेच. कारण याचा लवाजमा, आर्थिक बाजू या गोष्टी खूप मोठ्या आहेतच, पण त्या जोडीलाच संपूर्ण शरीराला पुन्हा मेकअप करून अभिनय करण्याचं आव्हान होतं.


अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे 

मध्यंतराच्या काळात ‘टुरिंग टॅाकीज’ या सिनेमाच्या निमित्ताने आॅस्करसाठी गेले असताना तिथल्या अनुभवानंतर मी लेखन करायला सुरूवात केली. नंतर मी एका इंग्रजी आणि हिंदी सिनेमाचं लेखन केलं. त्यानंतर एक शॅार्टफिल्म बनवली. यमनमधील बालविवाहावर आधारित असलेल्या या शॅार्टफिल्मनंतर ‘माझा अगडबम’चं दिग्दर्शन स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाची कथा माझी आहे. पटकथा मी शेख दाऊद जी. यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद ऋषिकेश कोळीचे आहेत.


२५० किलो वरून ३०० किलो

‘अगडबम’ हा सिनेमा सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यातील नाजूका २५० किलोंची होती. लग्नानंतर स्त्रियांचं वजन वाढतं. तसं आता काळानुरूप नाजूकाचंही वजन वाढलं असून, ती ३०० किलोंची झाली आहे. नाजूका हे डिसेंट आणि पाॅझिटीव्ह कॅरेक्टर आहे. ही शरीराने जरी मोठी असली, तरी मनाने खरी आहे. इतरांसारखी नाॅर्मल नसल्याने मजा आली.


मेकअपसाठी सहा तास

मेकअप आर्टिस्ट अनिल पेमगिरीकर आणि त्यांची कन्या रेणू यांनी नाजूकाच्या संपूर्ण शरीराला प्रोस्थेटिक मेकअप करून लठ्ठ दाखवलं आहे. यासाठी दररोज सहा तास लागायचे. मेकअप उतरवेपर्यंत खाणं नाही की, नैसर्गिक विधी नाहीत. केवळ पाणी पिऊन १२ तासांपेक्षा अधिक वेळ काम करायचे. असं ४३ दिवस शूट केलं.


३०० किलोंच्या गेटअपमध्ये दिग्दर्शन

नाजूकाचं वजन वाढलं त्याबरोबरच जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. यावेळी दिग्दर्शनाची जबाबदारीही होती. मीच दिग्दर्शिका असल्याने माझा सीन संपल्यानंतरही दिग्दर्शकाची भूमिका साकारताना पुढील सीन्स त्याच गेटअपमध्ये करावे लागायचे. त्यामुळे विश्रांती मिळतच नव्हती.


वेगळी कथा 

या सिनेमात मागच्या सिनेमातील कथा पुढे सुरू होत नाही, तर केवळ नाजूकाला केंद्रस्थानी ठेवून इतर व्यक्तिरेखा आणि कथा गुंफण्यात आली आहे. या सिनेमातील नाजूका कुस्तीच्या आखाड्यात उतरलेली पहायला मिळेल. मी इथेच थांबणार नसून या सिनेमाचा तिसरा भागही बनवणार आहे. त्याची घोषणा ‘माझा अगडबम’च्या अखेरीस करण्यात आली आहे.


अप्रतिम टीमवर्क

या सिनेमात माझ्यासोबत सुबोध भावे मुख्य भुमिकेत असून, तानाजी गालगुंडे, उषा नाडकर्णी, माईक आदींनीही भूमिका साकारल्या आहेत. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांच्यासोबत मी या सिनेमाची निर्मितीही केली आहे. २६ आॅक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

Exclusive Video: 'बघा' ‘सविता दामोदर परांजपे’ सिनेमाचा 'थरारक' प्रवास !

‘बॉईज २’ मध्येही धैर्या, ढुंग्या आणि कबीर करणार दंगा


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा