आपल्यालाही इतरांप्रमाणे आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. त्या दिशेनं जो तो प्रयत्नही करत असतो, पण फार कमी कलाकारांना अल्पावधीत आवडीप्रमाणे काम करण्याची संधी मिळते. अशाच संधीचा शोध मोनालिसा बागल या अभिनेत्रीला ‘परफ्युम’ या सिनेमापर्यंत घेऊन आला आहे. करण तांदळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘परफ्युम’ या मराठी सिनेमाच्या निमित्तानं ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना मोनालिसानं इतर विषयांवरही गप्पा मारल्या.
मागील काही वर्षांपासून केवळ छोट्याशा गावांमधील कलावंतही रुपेरी पडद्यावर आपलं टॅलेंट दाखवत लक्ष वेधून घेत आहेत. मोनालिसा बागलबाबत सांगायचं तरी तीदेखील एका लहानशा गावातून आलेली आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या एका गावातून आलेल्या मोनालिसानं आजतागायत सहा सिनेमांमध्ये नायिका साकारली आहे. यापैकी 'झाला बोभाटा' आणि 'ड्राय डे' हे दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. 'परफ्युम' हा प्रदर्शित होणारा मोनालिसाचा तिसरा सिनेमा आहे.
नगरपालिकेच्या शाळेत आठवीत शिकत असतानाच वडीलांचं छत्र हरवलेल्या मोनालिसानं आईच्या पंखांखाली वाढत रुपेरी पडद्यापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. आपल्या तिसऱ्या सिनेमाबाबत मोना म्हणाली की, माझ्या यापूर्वीच्या सिनेमांपेक्षा ‘परफ्युम’ खूप वेगळा आहे. यात जरी प्रेमकथा असली, तरी ती वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. या सिनेमासाठी मी लगेच होकार दिला नाही. जेव्हा मला या सिनेमाची ऑफर आली, तेव्हा मलाही वेळ नव्हता. त्यावेळी मी इतर सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र होते. करणसरांकडे उत्तम स्टोरीबोर्ड होता. त्यामुळे बिझी शेड्युलमधून वेळ काढत 'परफ्युम'साठी होकार दिला.
‘परफ्युम’ या सिनेमातील प्रेमकथेच्या वेगळेपणाबाबत मोना म्हणाली की, प्रेमाला बाऊंड्रीज नसतात. माणूस कोणत्याही गोष्टीच्या प्रेमात पडू शकतो. इतर सिनेमांमध्ये जसं मुलगा-मुलगी भेटतात आणि त्यांच्यात प्रेम होतं तसं ‘परफ्युम’मध्ये नाही. त्यामुळेच ही टिपीकल लव्ह स्टोरी नक्कीच नाही. खरं तर ही सुगंधावर प्रेम करणारी मुलगी आहे. सुगंधाच्या वेडामुळं ही मुलगी अत्तर बनवणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडते. त्यामुळं 'परफ्युम' हे शीर्षकही या सिनेमातील एक व्यक्तिरेखाच आहे.
या सिनेमाचा विषय एका वेगळ्याच पातळीवर हाताळण्यात आला असल्याचं सांगत मोना म्हणाली की, मी साकारलेली महेक अमेरिकेहून परतलेली आहे. महेकचा जन्म महाराष्ट्रात झाला असला तरी शिक्षणासाठी ती अमेरिकेत जाते. तिथे एक घटना घडल्यानं भारतात परतते. मी मूळात अमेरिकेत गेलेली नसल्यानं तिथलं कल्चर, लँग्वेज, स्टाईल यावर काम करावं लागलं. जसं दिग्दर्शकांनी सांगितलं तसं करत गेले. केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सर्वच गोष्टींपर्यंत मेहनत घेण्यात आली आहे. एक अनोखा सुगंध तिला खुणावत असतो. त्या सुगंधाचा मागोवा घेत ती एका तरुणापर्यंत पोहोचते. तो तरुण म्हणजे या सिनेमाचा नायक ओंकार दीक्षित. जेव्हा तो तिला भेटतो, तेव्हा तिला त्याच्या लहानसहान गोष्टी भावतात आणि ती प्रेमात पडते.
आजवर नेहमीच नवीन आणिा कमी वयाच्या नायकांसोबत काम केलेल्या मोनाची या सिनेमातही ओंकार दीक्षित या नवोदित आणि वयाने तिच्यापेक्षा कमी असलेल्या अभिनेत्यासोबत जोडी जुळली आहे. याबाबत मोना म्हणाली की, पहिल्या सिनेमापासूनच मला माझ्यापेक्षा कमी वयाचा नायक मिळाला आहे. त्यांच्याशी मॅच करून घेताना खूप मेहनत घ्यावी लागते. सुरुवातीला ओंकारच्या बाबतीतही तसंच झालं. पहिल्या दिवशी तो मला मॅडम म्हणायला लागला, तेव्हा मलाच आकवर्ड वाटू लागलं. ओंकार पटकन फॅमिलीअर होत नाही. सुरुवातीला तो थोडा अडखळत होता, पण नंतर लगेच त्याने सर्व गोष्टी कॅच केल्या. त्यामुळे आम्हाला काम करणं सोपं गेलं.
मोना सध्या अभिनयावर खूप मेहनत घेत आहे. तिला स्वत:ला एक सशक्त अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करायचं आहे. त्यामुळंच ती सध्या खूपच चूझी बनली आहे. याबाबत ती म्हणाली की, जानेवारीपासून माझ्याकडे जवळजवळ १०-१२ चित्रपटांच्या स्क्रीप्ट आल्या, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. मी आता निवडक सिनेमेच करणार आहे. मला जे हवं ते मिळत नसल्यानं नकार देत आहे. 'राझी'मधील आलिया भट्ट किंवा 'जैत रे जैत'मधील स्मिता पाटील मला नेहमी खुणावत असतात. मला त्यांच्यासारखी अभिनेत्री बनायचं आहे.
मोनाच्या म्हणण्यानुसार या सिनेमात जरी प्रेमकथा असली तरी ती खूप वेगळया पद्धतीने सादर करण्यात आली आहे. नायक आणि दिग्दर्शक अनुभवी नसले तरी त्यांनी एखाद्या मुरलेल्या कलाकार-तंत्रज्ञांप्रमाणे काम केलं आहे. सिनेमातील सर्वच कलाकारांचा अभिनय पाहण्याजोगा आहे. कोकणातील सावंतवाडी, गणपतीपुळे यांसारख्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आलं आहे. संगीत श्रवणीय असून, कोरिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीही मनमोहक आहे. त्यामुळेच हा सिनेमा केवळ तरुणाईसाठी नसून, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल यात शंका नाही.
हेही वाचा -
आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक
अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून...