आई-बाबा आणि फेसबुक!

  Mumbai
  आई-बाबा आणि फेसबुक!
  मुंबई  -  

  फेसबुकनं लाइव्ह नावाचं नवीन फिचर काय आणलं आणि अर्ध्या जगाला अक्षरश: याड लागलं. बर्थडे असो किंवा पार्टी, मुला-मुलींच्या डोक्यावर लाइव्हचं भूत चढलंय. अहो अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तरूण मंडळी लाइव्ह करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय किंवा पाहिलंय का? आई-बाबांना लाइव्ह करताना? मुलं एवढी टेक्नोसॅव्ही असल्यावर आई-बाबा तरी कसे मागे राहतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणाच्या आई-बाबांबद्दल बोलतेय? हे तुमच्या किंवा माझ्या आई-बाबांबद्दल नाही आहे, तर अमेय वाघच्या आई-बाबांबद्दल आहे. अमेय वाघच्या आगामी 'मुरांबा' चित्रपटात अमेयची आई म्हणजे चिन्मयी सुमित आणि बाबा म्हणजे सचिन खेडेकर हे फेसबुकवर लाइव्ह गेले. फेसबुक लाइव्हची वाढती क्रेझ पाहता 'मुरांबा' चित्रपटाच्या टीमनं प्रमोशनचा हटके फंडा निवडला आहे.

  टेक्नोसॅव्ही बाबा आणि सोशल मीडियाचा जराही गंध नसलेली आई लाइव्ह जातात आणि धम्माल उडते. व्हीडिओची सुरुवातच भन्नाट झाली असून आई-बाबांची भूमिका साकारणारे सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित या दोघांनीही विनोदाचे अफलातून टायमिंग साधले आहे. फेसबुकवर लाइव्ह जाण्यासाठी ती तयार होते. पण लवकरच बाबा तिचा हा समज दूर करतात. "अगं कुठं बाहेर जायचं नाहीये, घरूनच लाइव्ह जायचं आहे.” हे उत्तर ऐकताच आईचा चेहरा पडतो आणि रागाच्या भरात बाबांना चार शब्द ऐकवते. दोघांमधील संवाद आणि परिस्थिती अगदी मजेशीररित्या मांडण्यात आली आहे.

  पहिल्यांदाच लाइव्ह गेल्याने आई-बाबांची तारांबळ उडते. "बरं आहे ना सुरुवातीलाच आरसा ठेवलाय तो. मी जरा टिकली नीट करू का?” आपण लाइव्ह गेल्याचं आईला कळतच नाही. मग बाबा सांगतात "अगं कॅमेरा आहे तो, आपण दिसतोय सर्वांना.” पण आईला या फेसबुक लाइव्हचा फंडा काही कळतच नव्हता. त्यामुळे तिला अनेक प्रश्न पडत होते. फेसबुक स्क्रिनवर मिळणारे लाइक्स आईला फुलपाखरू वाटू लागले. त्यात मिनाक्षी म्हणजेच बेबी आत्या बाबांच्या टी- शर्टचं कौतुक करते आणि आईच्या नवीन साडीचं कौतुक करत नाही म्हणून आई बेबी आत्याला सुनावते की, "घरी आलं तरी तेच आणि इथं फेसबुकवरही तेच.” पण आपण बोलतोय ते सर्व जण ऐकत आहेत हे आईला माहीत नसतं. पण जेव्हा बाबा सांगतात तेव्हा मात्र आईची तारांबळ उडते. असे एक ना अनेक मजेशीर किस्से व्हीडिओत पाहायला मिळतात. फेसबुक लाइव्ह कळल्यानंतर आईसुद्धा फेसबुक लाइव्हच्या प्रेमात पडते. पण यात कोपऱ्यात उभा असलेला आलोक मात्र पूर्ण भांबावून गेलेला असतो. कारण आई त्याच्या साखरपुड्याविषयी चर्चा सुरू करते. फक्त चर्चाच करत नाही तर आलोकच्या गर्लफ्रेंडची सर्वांना ओळखही करून देते. आता चर्चा तर होणारच ना? आणि त्यात लाइक्स आणि कमेंटचा पाऊस सुरू होतो.

  मिथिला पालकर आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असणारा 'मुरांबा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.