Advertisement

चवीसारखाच मनात रेंगाळणारा...गुलाबजाम!

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा नवा चित्रपट गुलाबजाम नावाप्रमाणेच गोड आहे. गुलाबजामप्रमाणेच त्याची चवही आपल्या जिभेवर रेंगाळत रहाते.

चवीसारखाच मनात रेंगाळणारा...गुलाबजाम!
SHARES

खादा भन्नाट पदार्थ चाखल्यानंतर त्याची चव आपल्या जिभेवर बराच काळ रेंगाळत रहाते. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा नवा चित्रपट गुलाबजाम काहीसा असाच आहे! एक तर तो नावाप्रमाणेच गोड आहे. आणि दुसरं म्हणजे गुलाबजामप्रमाणेच त्याची चवही आपल्या जिभेवर रेंगाळत रहाते.

ही कथा आहे लंडनमध्ये राहणारा आदित्य (सिध्दार्थ चांदेकर) या मराठमोळ्या तरूणाची. सिद्धार्थला लंडनमध्ये महाराष्ट्रीय पदार्थांचं रेस्टॉरंट काढायचं असतं. त्यासाठी उत्तम स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात तो पुण्यात येतो. आणि इथेच त्याची भेट राधाशी (सोनाली कुलकर्णी) होते. या दोघांनी मिळून बनवलेले पदार्थ आणि त्यातून राधा आणि सिद्धार्थचं उलगडत गेलेलं व्यक्तिमत्व, राधाला कायम सलत रहाणारा तिचा भूतकाळ यातून हा चित्रपट प्रेक्षकांना उलगडत जातो. अस्सल मराठी पदार्थ, राधाचं कौशल्य आणि आदित्यचा उत्साह या तिघांची मिळून दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी तयार केलेली रेसिपी अगदी परफेक्ट जुळून आली आहे!



मुळातच कथानक खमंग अशा मराठमोळ्या रेसिपीजवर आधारित असल्यामुळे चविष्ट झालं आहे. नेहमीच्या टिपिकल विषयांच्या पलीकडे जाऊन एक वेगळी आणि वेगळ्या पद्धतीने फुलत जाणारी रेसिपी स्टोरी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी मांडली आहे. मध्यांतरानंतर चित्रपट काही ठिकाणी रेंगाळलेला वाटतो. पण पदार्थ तयार व्हायला वेळ लागतो, आणि तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो, तसाच हा गुलाबजाम तयार होईपर्यंत थोडीशी वाट पहावी लागते.

एकटी राहणारी, भुतकाळाचं ओझं मनावर असणारी पण तरीही जीव ओतून स्वयंपाक करणारी राधा सोनाली कुलकर्णीने परफेक्ट उभी केली आहे. या भूमिकेसाठी सोनालीला फारसं काही चाकोरीबाहेर जावं लागलं नसावं. दुसरीकडे सिद्धार्थनंही त्याच्या आवडीच्या मागे धावणारा आणि त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणारा आदित्य योग्य वठवला आहे. आदित्यला स्वयंपाक शिकवताना राधाचं त्याच्यासोबत निर्माण झालेलं मैत्रीच्या थोडं पलिकडचं आणि प्रेमाच्या थोडं अलिकडचं नातं या चित्रपटाची गोडी अजूनच वाढवतं.



त्याचबरोबर या चित्रपटात सतत येणारी पदार्थांची नावं, पदार्थाचे रंग, पदार्थ तयार होताना सुटलेला घमघमाट अगदी चित्रपटगृहात भरून रहातो! पदार्थ तयार होताना तोंडाला सुटलेलं पाणी आणि राधाचा भूतकाळ ऐकताना नकळत डोळ्यात आलेलं पाणी यातून चित्रपट आपल्याही नकळत मनाला जाऊन भिडतो. हॅपी जर्नी, राजवाडे अॅण्ड सन्स, वजनदार अशा चित्रपटांच्या यादीमध्ये सचिन कुंडलकर यांनी गुलाबजाम या आणखी एका सरळ साध्या चित्रपटाची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी आणली आहे.

साधारणपणे चित्रपट म्हटलं की किमान चार ते पाच गाणी असतातच. पण गुलाबजाममध्ये फक्त एकच गाणं आहे. तरीही, संपूर्ण चित्रपटात कुठेही गाण्याची कमतरता जाणवत नाही. शिवाय हे एकमेव गाणंही अगदी चपखलपणे बसलंय.

एकूणच काय, तर जेवणाची मजा वाढवण्यासाठी जसं आपण गोड खातो, तसं आयुष्याची मजा वाढवण्यासाठी एकदा तरी हा चित्रपट पहायला हरकत नाही.



Movie - Gulabjam

Actor - Siddharth Chandekar, Sonali Kulkarni

Ratings - 3/5

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा