Advertisement

अनुपम खेरांच्या शिष्या जानकी रुपेरी पडद्यावर!


अनुपम खेरांच्या शिष्या जानकी रुपेरी पडद्यावर!
SHARES

आजच्या पिढीतील काही मुलं प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. भविष्यात आपण काय बनायचं? ते त्यांनी बालपणीच ठरवलेलं असतं. ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या जानकी पाठकनेही बालपणीच अभिनयाचं स्वप्न पाहिलं होतं. पदार्पणातच शीर्षक भूमिका साकारत तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेपही घेतली आहे.

१६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’सोबत बातचित करत जानकीने आपल्या पहिल्या चित्रपटापर्यंतचा प्रवास शेअर केला.


बालपणी पाहिलेलं स्वप्न

मूळची ठाण्यातील असलेल्या जानकी पाठकने अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बालपणीच पाहिलं होतं. त्यामुळेच शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी तिने कधीच वाया घालवली नाही. इथेच तिने अभिनेत्री बनण्यासाठी आवश्यक असणारे पहिले धडे गिरवले आणि इतर कलाकारांप्रमाणे शाळेतच तिच्या अभिनयाचा पाया रोवला गेला आहे.


खेरांच्या शाळेत अभिनयाचे धडे

शाळा-कॉलेजमध्ये हौशी अभिनय केल्यानंतर अभिनयाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याबाबत जनकी म्हणाली, अभिनय करण्याचा निश्चय ठाम असल्याने मी अभिनेते अनुपम खेर यांच्या शाळेत रीतसर अॅडमिशन घेतलं. त्यांच्या पूर्णवेळ शाळेमध्ये तीन महिन्यांचा कोर्स केला. यामध्ये मला अभिनयातील बारकाव्यांसोबत फिल्ममेकिंगसाठी आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टीही शिकवण्यात आल्या. त्याचा फायदा मला ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ या चित्रपटादरम्यान झाला.


वडिलांनीच दिला ब्रेक

या चित्रपटाची निर्मितीसह लेखन आणि दिग्दर्शन जरी माझे वडील गिरीश विश्वनाथ यांनी केलं असलं, तरी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवड केली जाणं ही प्रक्रिया माझ्यासाठी सोपी नव्हती. या चित्रपटाची कथा काय आहे, हे जरी मला पहिल्या दिवसापासून ठाऊक असलं तरी रीतसर ऑडिशनच्या माध्यमातून या चित्रपटात तेजूची भूमिका साकारण्यासाठी माझी निवड झाली. माझंही कास्टिंग इतर कलाकारांप्रमाणेच करण्यात आलं आहे.


थोडं दडपण

‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने प्रथमच कॅमेरा फेस करताना थोडी नर्व्हस होते. थोडं दडपणही जाणवत होतं, पण इतर सहकलाकारांनी धीर दिला. त्यामुळे आत्मविश्वास दुणावला आणि चित्रपटात काम करणं खूप सोपं गेलं. या चित्रपटात माझ्या जोडीला रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव हे कलाकार आहेत. सर्वांचीच चांगली साथ लाभली.


चित्रीकरण म्हणजे पिकनीक

या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये झालं आहे. आजूबाजूच्या वातावरणामुळे सेटवर कायम पिकनीकचाच मूड असायचा. यात माझ्या वडिलांची भूमिका साकारणारे रवी काळे घोड्यावरून पर्यटकांना माथेरानची सैर करवून आणणारे असल्याने घोड्यांमुळेही पिकनीकसारखंच वातावरण होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांची कथा आणि व्यथाही पाहायला मिळणार आहे.


मैत्रीची कथा

या चित्रपटात मी साकारलेली शाळकरी मुलगी तेजू आणि तिची व्हॅनिला नावाची कुत्री यांच्या मैत्रीची कथा पाहायला मिळेल. माथेरानमधल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणाऱ्या तेजूला त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’ सापडते. या दोघींमध्ये अनाहुतपणे मैत्रीचा धागा गुंफला जातो. पुढे व्हॅनिलाला वाचवण्यासाठी तेजू काय काय करते ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. ‘व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दाही ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’मध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा