Advertisement

कॉमेडीचा करपलेला तडका...लूज कंट्रोल!

चित्रपटाचे प्रोमो आणि ट्रेलर पाहून विनोदाची मेजवानी, धम्माल, फुल्ल टू टाईमपास आणि निखळ मनोरंजन होणार असा समज प्रेक्षकांचा होतो. मात्र, चित्रपट संपेपर्यंत कुठेतरी आपला समज 'गैर'समज असल्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना होतो.

कॉमेडीचा करपलेला तडका...लूज कंट्रोल!
SHARES

एखादा गंभीर विषय कॉमेडी स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर करणं तसं कठीणच असतं. हे आव्हान याआधीही अनेकांनी उचललं आणि यशस्वीरीत्या पेललंही. तसाच काहीसा प्रयत्न 'लूज कंट्रोल'च्या माध्यमातून दिग्दर्शक अजय सिंग यांनी केला आहे. चित्रपटाचे प्रोमो आणि ट्रेलर पाहून विनोदाची मेजवानी, धम्माल, फुल्ल टू टाईमपास आणि निखळ मनोरंजन होणार असा समज प्रेक्षकांचा होतो. मात्र, चित्रपट संपेपर्यंत कुठेतरी आपला समज 'गैर'समज असल्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना होतो.

लूज कंट्रोलच्या माध्यमातून एक गंभीर विषय प्रेक्षकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, त्याला कॉमेडी अँगल देताना दिग्दर्शकाचाच चित्रपटावरचा कंट्रोल लूज झालेला दिसतो. 'लूज कंट्रोल' ही इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या तीन मित्रांची कथा. पालेकर (अक्षय म्हात्रे), फंबल(शशिकांत केरकर) आमि स्कॅनर(मनमित पेम) हे तीन जिवलग मित्र इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असतात. त्यांच्या नावांप्रमाणेच अतरंगी असलेली ही पात्र निव्वळ पालकांच्या जबरदस्तीमुळे इंजिनिअरिंगला आलेली असतात. त्यामुळे या तिघांना पास होण्यासाठी विविध क्लृप्त्या कराव्या लागतात. आणि त्यांना यासाठी मदत करतो तो कुशल बद्रिके. एक विचित्र ऑफर तो या मुलांसमोर ठेवतो. पास होण्यासाठी ही मुलं वाट्टेल ते करायला तयार होतात. ही संपूर्ण कथा ३१ डिसेंबरच्या रात्री घडते. त्या रात्री नेमका काय गोंधळ उडतो? आणि त्यातून शेवटी काय घडतं? याची कथा म्हणजे 'लूज कंट्रोल'!



पण मुळात नक्की कॉमेडी करायचीये की सामाजिक संदेश द्यायचाय? यातच गफलत झाल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना गोंधळात टाकतो. एकाच वेळी अनेक विषयांना हात घालण्याचा हा तोटा! त्याचाच परिणाम म्हणून एखादा सीन सुरू असताना 'हा सीन इथे का?' असा प्रश्न अनेकदा पडतो.

पाहायला गेलं, तर चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत. मात्र, त्यांचा योग्य वापर दिग्दर्शकाला करता आलेला नाही. चांगले कलाकार असूनही हा चित्रपट अर्धवट वाटतो. शशिकांत केरकर, मनमित पेम, अक्षय म्हात्रे या तिघांनीही आपली कामं चोख बजावली आहेत. मात्र, भाऊ कदम आणि कुशल बद्रीके या दोघांना म्हणावा तितका वाव चित्रपटात मिळालेला नाही. आणि परिणामी विनोदाचे बादशहा चित्रपटात एकत्र असताना शेवटपर्यंत त्या दर्जाच्या विनोदाची प्रेक्षक फक्त वाटच पाहात राहातात. मनमित पेमच्या तोंडी दिलेली विदर्भाची भाषाही काही वाक्यांपुरतीच मर्यादित राहिली आहे. पुढे मनमीत आपण विदर्भाकडचं पात्र आहोत, हे विसरला की काय, असंच वाटत रहातं. त्यातल्या त्यात शशांक शेंडे हे एक सरप्राईझ पॅकेज चित्रपटात आहेत. या आधी शशांक शेंडे यांना कॉमेडी करताना आपण बघितलेलं नाही.



चित्रपटात ड्रग्स, मुलांवर अमुक एक शिकण्यासाठी पालकांची होणारी जबरदस्ती, गरीबीमधून वाट काढत शिकणारा मुलगा आणि एखाद्या एमएमएसमुळे मुलीला होणार आयुष्यभराचा त्रास अशा अनेक विषयांना एकाच चित्रपटात हात घालण्याच्या अट्टहासामुळे कथा भरकटली आहे. एमएमएसमुळे मुलीला होणारा आयुष्यभराचा त्रास हा एकच विषय चित्रपटात घेतला असता, तर कदाचित त्याचा योग्य परिणाम प्रेक्षकांवर झाला असता.

कॉमेडीचा विचार केला, तर मध्यांतराच्या आधी चित्रपटात थोडीफार कॉमेडी बघायला मिळते. मध्यांतरानंतर मात्र चित्रपट अतिशय रटाळ झाला आहे. चित्रपटात असलेली गाणीही काही ठिकाणी मध्येच उगवल्यासारखी वाटतात. प्रेक्षकांनाच त्यांचा चित्रपटाच्या कथेशी संबंध जोडण्याची कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी संगीत कर्कश्श्य झाल्यामुळे प्रेक्षकांना 'आवाज वाढव' नाही तर 'आवाज कमी कर रे डीजे' असं म्हणण्याचीच पाळी येते!



चित्रपटाचा शेवटही फार ताणला गेल्यासारखा वाटतो. त्यामुळे आधीच नसलेल्या कॉमेडीमुळे अपेक्षाभंग झालेल्या प्रेक्षकाची चलबिचल व्हायला लागते.

आता तुम्ही जर कॉमेडीचे चाहते असाल आणि भाऊ कदम, कुशल बद्रिके या मंडळींचे फॅन असाल, तर आणि तरच चित्रपटाला जाण्याची तयारी करा. नाहीतर आपले पैसे आणि आपला वेळ या दोन मौल्यवान गोष्टी न दवडणे हेच उत्तम!


Movie - Loose Control

Actor - Bhau Kadam, Kushal Badrike, Shashank Shende, Akshay Mhatre, Manmit Pem, Shashikant Kerkar

Ratings - 1.5/5

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा