Advertisement

‘पिकासो’च्या प्रेमात महेश भट्ट

आजकाल बरेच हिंदी फिल्ममेकर्स मराठी सिनेमांच्या प्रेमात असल्याचं पहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही मराठीचा लळा लागला आहे.

‘पिकासो’च्या प्रेमात महेश भट्ट
SHARES

आजकाल बरेच हिंदी फिल्ममेकर्स मराठी सिनेमांच्या प्रेमात असल्याचं पहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही मराठीचा लळा लागला आहे.

मराठी सिनेमे नेहमीच नवनवीन प्रयोगांच्या आधारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता प्रथमच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि त्यात काम करणाऱ्यांची व्यथा पहायला मिळणार आहे. नुकताच फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलेल्या 'पिकासो' या मराठी चित्रपटात हे आगळंवेगळं कथानक पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओकच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक उत्कंठा वाढवणारा असून, त्याच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झालं आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ‘पिकासो’चं पोस्टर ट्विट केल्यानं याबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.

अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून, 'कोर्ट' या बहुचर्चित तसंच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केलं असून, कथाही त्यांचीच आहे. वारंग यांचा हा पहिलाच चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' व '७ व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे  या चित्रपटाचे विशेष खेळ दाखवण्यात येणार आहेत.

 तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी-नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध असून, 'पिकासो' हा चित्रपट लोककलेवर आधारित आहे. योगायोग म्हणजे त्याचं चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आलं आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून, राजाश्रय व सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचं काम दशावतारी कलावंत करत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तीन लाख पन्नास हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारनं या कलावंतांच्या तसंच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत.

या चित्रपटात बालकलाकार समय संजीव तांबे प्रमुख भूमिकेत असून, प्रसाद ओकनं दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या किल्ला चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे ‘पिकासो’चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून, त्यांचं या सिनेमाच्या निर्मितीत विशेष योगदान आहे. या वर्षा अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते शैलादित्य बोरा यांचा मानस आहे.हेही वाचा -

सलमानच्या मराठी सिनेमासाठी रंगवली गावातील घरं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकल प्रवास पाहिला का?
संबंधित विषय
Advertisement