Advertisement

मराठीतही ॲक्शनपटाची धमाल!

मराठी सिनेमे आशयघन असतात, त्यातील विषय मनाला भिडतो असं नेहमीच म्हटलं जातं. या जोडीला आता मराठीला ॲक्शनचीह जोड मिळाल्याचं पहायला मिळणार आहे.

मराठीतही ॲक्शनपटाची धमाल!
SHARES

मराठी सिनेमे आशयघन असतात, त्यातील विषय मनाला भिडतो असं नेहमीच म्हटलं जातं. या जोडीला आता मराठीला ॲक्शनची जोड मिळाल्याचं पहायला मिळणार आहे.

मराठीतही ॲक्शन फिल्म्सचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळं चित्रपटांमध्ये ॲक्शन सीन्स फारच कल्पकतेनं रचलेले आणि तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक चित्रीत केले जातात. स्टंट्स आणि ॲक्शन पाहण्याचा आनंद मोठ्या पडद्यावर अधिक मिळत असल्यानं सिनेरसिक असे चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात; परंतु थरारक ॲक्शन सीन्स शूट करणं हे मोठ्या खर्चाचं आणि वेळखाऊ काम असल्यानं मराठी चित्रपटांमध्ये ॲक्शन बेतानंच पाहायला मिळतं. आता मात्र मराठीतही एक भव्य थरारक ॲक्शनपट पहायला मिळणार आहे. समीर मुकुंद आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेन्डा निर्मित ‘बकाल’ हा भव्य ॲक्शनपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ऐंशी-नव्वदच्या दशकात विदर्भातील तरुणांना गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात जखडून ठेवणाऱ्या ‘बकाल’ नावाच्या एका विखारी, अदृश्य यंत्रणेनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या यंत्रणेचा म्होरक्या ना कधी जगासमोर आला, ना कधी सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला. अशा ‘बकाल’ नावाच्या घातक शक्तीला एका समांतर सुरक्षा संघटनेच्या युवकांनी मोठ्या शिताफीनं आश्चर्यकारकरित्या उध्वस्त केलं. या सत्य घटनेच्या आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ‘मारबत’ परंपरेच्या मूळ उद्देशाच्या आधारावर ‘बकाल’ बेतलेला आहे.

‘बकाल’च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला निर्भिडपणं स्वत: स्टंट्स करणारा एक नवा ॲक्शन-डान्सिंग स्टार गवसला आहे. लहानपणापासून उत्तम नर्तक आणि साहसी खेळ प्रकारात स्वअध्ययनानं प्राविण्य मिळविलेला मुंबईचा चैतन्य मेस्त्री चित्रपटाचा नायक आहे. बकालमधील जवळपास सर्व स्टंट्स आणि ॲक्शन सीन्स त्यानं स्वत: केलेल्या आहेत. त्याच बरोबर झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक – छोटे चॅम्पियन्स’ या डान्सींग रीॲलिटी कार्यक्रमाची आणि मटा श्रावणक्वीन - २०१७ ची उपविजेती जुई बेंडखळे या नवोदित अभिनेत्रीनं मुख्य नायिका साकारली आहे.

या दोघांखेरीज अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कार्येकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पूजा नायक आदी मातब्बर कलावंतांनी या सिनेमात अभिनय केला आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केलेले कॅमेरामन समीर आठल्ये यांचं दिग्दर्शन, विनोद देशपांडे यांचं लेखन, मिलिंद सावे यांची पटकथा आणि स्पेशल इफेक्ट्स, अभिराम भडकमकर यांचे संवाद, फाईट मास्टर अंदलीब पठाण यांच्या ॲक्शन्स, दिलीप आणि दीपा मेस्त्री यांच्या नृत्य दिग्दर्शनानं बहरलेल्या या चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतसाज चढवला आहे.



हेही वाचा -

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा